November 12, 2025
गांधीवादी विचारांची कास धरून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजुरसारख्या अतिशय दुर्गम भागात ज्यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवत आदिवासी जनतेच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले असे सत्यनिकेतन संस्थेचे संस्थापक सचिव तथा थोर गांधीवादी कार्यकर्ते स्व.रा.वि. पाटणकर यांना २१ व्या स्मृतीदीनानिमित्ताने आज १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सत्यनिकेतन संस्थेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सत्यनिकेतन परिवारातील सर्व पदाधिकारी, संचालक, सभासद, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये स्व.रा.वि. पाटणकर यांच्या स्मृतीस्थळावरील अर्धाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. स्व.रा.वि. पाटणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख, सौ.बिना सावंत, श्री.बाळासाहेब घिगे व सावित्रीबाई मदन कन्या निवासच्या मुलींनी सुश्राव्य अशा संगीतमय सर्वधर्मीय प्रार्थनेचे गायन केले.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतांमध्ये स्व.रा.वि. पाटणकर यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्यकर्तुत्वाचा इतिहास सांगितला. गुरुवर्य रा.वि. पाटणकर, बापूसाहेब शेंडे व सावित्रीबाई मदन या त्रिमुर्तींचा सत्यनिकेतन संस्थेच्या उभारणीमध्ये असलेल्या योगदानाचा मान्यवरांनी उल्लेख केला. सत्यनिकेतन संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.टी.एन.कानवडे, श्री.एस.टी.येलमामे, श्री.विजय पवार, प्राचार्य श्री.बी.के.बनकर, प्राचार्य श्री.बी.वाय. देशमुख, श्री.विनय सावंत आदी मान्यवरांनी स्व.रा.वि. पाटणकर यांनी संस्थेच्या तसेच अकोले तालुक्यातील आदिवासी जनतेच्या उन्नतीसाठी केलेल्या त्यागाची विद्यार्थ्यांना माहिती दिली.
सत्यनिकेतन संस्थेच्या सर्व विभागांतील कर्मचारीवर्ग, माजी शिक्षक व उच्च माध्यमिक विभागाचे विद्यार्थी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रमुख श्री.एस.जे.शेटे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले. श्री.संतराम बारवकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.





|
“तुमच्या आठवणींची पावलं आज १२ नोव्हेंबर- ‘सत्यनिकेतन’ संस्थेचे संस्थापक सचिव स्व.रा.वि.पाटणकर यांचे २१ वे पुण्यस्मरण…. गांधीवादी विचारांची कास धरून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजुरसारख्या अतिशय दुर्गम भागात ज्यांनी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवत आदिवासी जनतेच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले अशा या महापुरुषाबद्दल थोडेसे…. महात्मा गांधींच्या हत्येनंतर थोड्याच काळात मुंबई सरकारने महाराष्ट्रामध्ये सर्वोदय योजना सुरू केली. महात्मा गांधी यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्मारक उभारण्याच्या कल्पनेचे मूर्त स्वरूप म्हणजे ‘सर्वोदय’ योजना. त्या योजनेतील एक अतिशय आदर्श व सजीव स्मारक म्हणजे राजूर, ता.अकोले, जि.अहमदनगर येथील ‘सर्वोदय योजना केंद्र’. १९५० साली ‘भारतीय आदिम जाती सेवा संघ, नवी दिल्ली’ या संस्थेशी संलग्नता असलेली ‘सत्यनिकेतन’ नामक संस्था स्थापन करून सर्वोदयी चळवळ व विचार सर्वसामान्यांपर्यंत यशस्वीरीत्या पोहचविण्याचे बहुमूल्य कार्य सी.गं. उर्फ बापूसाहेब शेंडे, सावित्रीबाई मदन व रा.वि.पाटणकर या समाजसेवकांनी सुरू केले. सर्वोदय योजनेची संपूर्ण जबाबदारी रा.वि.पाटणकर यांनी स्वीकारून आपल्या कार्याला सुरुवात केली. खादीवर प्रचंड निष्ठा असणार्या पाटणकरांनी राजूरसारख्या डोंगराळ, आदिवासी व ग्रामीण भागामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महात्मा गांधींच्या मूल्यांची जोपासना करत गोरगरीब आदिवासी जनतेच्या सामाजिक, संस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्या काळामध्ये ‘सर्वोदय योजना केंद्र’ हे अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव केंद्र होते. आदिवासी विभागामध्ये विविध उपक्रम राबवून कृषिविकास, शैक्षणिक विकास, औद्योगिक विकास, पाणलोट विकास, आरोग्य सुविधा, सामाजिक व सांस्कृतिक विकास यासारख्या माध्यमातून आदिवासी समाजाचे जीवनमान उंचवण्याचा आटोकाट प्रयत्न रा.वि.पाटणकर यांनी केला. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘आदिवासी सेवक’ पुरस्कार देऊन गौरविले होते. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे शैक्षणिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले होते. १९२० मध्ये रत्नागिरी येथे जन्मलेल्या रा.वि.पाटणकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य राजूरमध्ये आदिवासी जनतेच्या सेवेसाठी व्यतीत केले. २००४ मध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. आज १२ नोव्हेंबर रोजी त्यांचे २१ वे पुण्यस्मरण. ‘सत्यनिकेतन’ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली… – सचिव, ‘सत्यनिकेतन’ |

|
एका युगाची गोष्ट
साधारणतः 70-75 वर्षांपूर्वी राजूर सारख्या अतिदुर्गम भागात शिक्षणाची ज्ञानगंगा त्रिमूर्तींच्या डोक्यातून अवतरली! ज्याप्रमाणे गोदावरी नदीचा उगम भगवान शंकरांच्या जटेतून ब्रह्मगिरी पर्वतावर झाला तद्वतच सर्वोदय (सत्यनिकेतन) नावाची ज्ञानगंगा राजूर सारख्या आदिवासी भागात अवतरली! रा.वि.पाटणकर, सावित्रीबाई मदन व बापूसाहेब शेंडे या त्रिमुर्तींना प्रथमत: शत-शत नमन!
या त्रिमुर्तींना एका वेडाने पछाडले होते ते म्हणजे “सर्वोदय”. शिक्षणाशिवाय हा विचार पुढे नेणे शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर या अवलियांनी एक संस्था निर्माण केली ती म्हणजे “सत्यनिकेतन”. राजूरमध्ये एक शाळा सुरू झाली ‘सर्वोदय विद्या मंदिर’ आणि या ज्ञानगंगेने हळूहळू विस्तृत रूप धारण करायला सुरुवात केली. पात्र विस्तारत गेले त्यातून नवभारत छात्र निवास, सावित्रीबाई मदन मुलींचे वसतिगृह, सर्वोदय छात्र निवास कोतूळ व अकोले, सर्वोदय विद्या मंदिर, कातळापूर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आश्रम शाळा शेणीत व सर्वोदय विद्या मंदिर, खिरविरे,अशा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांची स्थापना केली. तसेच ॲड.एम.एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना करून सत्यनिकेतन संस्थेने उच्च शिक्षणाची द्वारे खुली केली. या लेखाचे शीर्षक “एका युगाची गोष्ट” आहे त्यामुळेच त्यावरच चर्चा करूया…. हे युग सुरू झाले साधारणतः 70-75 वर्षांपूर्वी, नुकतेच भारताला स्वातंत्र्य मिळाले होते, परंतु माझा राजुर व चाळीसगाव डांगान परिसर अजूनही मुख्य प्रवाहात नव्हता, याला मुख्य कारण म्हणजे शिक्षण. शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या पण आमच्यावर सावित्री माईंची कृपा झाली व या त्रिमूर्तींचा परिसस्पर्श राजूरला झाला व या ‘ज्ञानयुगाला’ सुरुवात झाली. अनंत अडचणींचा सामना करत त्यांनी सत्यनिकेतन संस्था विस्तारत नेली. त्याकाळी दळणवळणाच्या सुविधा नसतानाही पायी फिरून आमच्यासारख्या अगणित मुलांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणले. आज या भागात जी प्रगती दिसते आहे त्याला एकमेव कारण म्हणजे “सत्यनिकेतन”….
हे झाले शिक्षणाच्या बाबतीत, परंतू रा.वि.पाटणकर, सावित्रीबाई मदन व बापूसाहेब शेंडे हे त्रिमूर्ती थांबणारे नव्हते. त्यांनी या परिसराचा अभ्यास केला व शिक्षणाबरोबरच स्वयंरोजगार व कुशल कामगार तयार करण्यासाठी लोकांना उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून आत्मनिर्भर बनविण्यासाठी काडीपेटी कारखाना, साबण कारखाना, बेकरी उद्योग, सूप तयार करणे, पाट्या तयार करणे, टोपले विणणे, हातमाग हे व असे अनेक उद्योग सुरू केले. या माध्यमातून लोकांना अर्थार्जन कसे करता येईल याचे धडे दिले. महाराष्ट्र शासनाचा निधी उपलब्ध नसतानाही त्यांनी गावोगावी अंगणवाड्या सुरू केल्या. परित्यक्ता महिलांसाठी निवास व्यवस्था सुरू केली. आज एकच प्रश्न मनात येतो की हे युग जर अवतरले नसते तर माझा राजूर परिसर कसा असता? आमचा सर्वांगीण विकास झाला असता का? आज रा.वि.पाटणकर बाबांच्या म्हणजेच या त्रिमूर्तीतील एका देवाच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांची खूप आठवण झाली, म्हणून त्यांच्या चरणी शब्दरूपी आदरांजली…. त्यांनी सुरू केलेले कार्य अविरतपणे चालू राहो हीच सदिच्छा! विनम्र अभिवादन बाबा!
प्रा .व्ही.बी. येलमामे (अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालय, राजूर) |










