January 03, 2026
सावित्रीबाई फुले या आधुनिक भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत होत्या. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य वाहिले. पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली आणि तेथूनच महिला शिक्षणाची ज्योत पेटली.
अशा या महान समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्याक्रमध्ये विद्यालयातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील खडतर प्रवास, समाजातील विरोधाला सामोरे जात मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग कसा खुला केला यावर सविस्तर प्रकाश टाकला. विद्यालयातील महिला शिक्षिकांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यालयातील मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनप्रवासावर अतिशय प्रभावी शैलीमध्ये आपली मनोगते व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक श्रीमती अनिता जंबे यांची महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी-अधिकारी संघटनेच्या राज्य महिला संचालिकापदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांनी व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.














