February 10, 2026
सत्यनिकेतन संस्था संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केंद्र क्रमांक २७२ व अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालय, केंद्र क्रमांक ८०३ या राजूरमधील दोन्ही परीक्षा केंद्रांवर १० फेब्रुवारी पासून एच.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२६ सुरळीतपणे सुरु झाली.
महाराष्ट्र शासनाच्या ‘कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा’ या संकल्पनेअंतर्गत राजूरमधील दोन्ही केंद्रांवर मंगळवारपासून परीक्षा सुरु झाली. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर व पंचायत समिती शिक्षण विभाग, अकोले यांच्या नियंत्रणाखाली यावर्षाची बारावीची ही परीक्षा पार पडत आहे.
परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासन निर्देशानुसार यावर्षाची परीक्षा ही CCTV व LIVE Webcasting या तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ही दोन्ही केंद्रे सक्षम व सर्व सुविधायुक्त आहेत. परीक्षा सुरु होण्यापूर्वी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही केंद्रांना भेट देऊन ही केंद्रे सर्व सुविधायुक्त असल्याचे तपासून घेतले. दोन्ही केंद्रांच्या सर्व वर्गाखोल्यांमध्ये व परिसरामध्ये CCTV कॅमेरे तैनात आहेत व इमारतींभोवती संरक्षक भिंती आहेत.
परीक्षा सुरु होण्यापूर्वी सर्व पर्यवेक्षकांची बैठक घेऊन त्यांना पर्यवेक्षणासंदर्भातील सर्व सूचना व झालेले बदल यासंदर्भात सूचित करण्यात आले. केंद्र क्रमांक २७२ या केंद्राचे केंद्रसंचालक म्हणून श्री.दिपक बुऱ्हाडे हे काम पाहत आहेत. केंद्र क्रमांक ८०३ या केंद्राचे केंद्रसंचालक म्हणून श्री.शरद तुपविहीरे हे काम पाहत आहे. श्री.सुनिल मालुंजकर, श्री.अमोल तळेकर व श्री.सुधिर आहेर हे सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत.
सर्वोदय राजूर, अॅड.एम.एन.देशमुख जुनिअर कॉलेज राजूर, श्री.स्वामी समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय राजूर, मा.मधुकररावजी पिचड उच्च माध्यमिक विद्यालय राजूर, उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी (भंडारदरा), उच्च माध्यमिक विद्यालय बारी व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरकणे या सर्व उच्च माध्यमिक विद्यालायांमधील एकूण ७४३ विद्यार्थी या दोन्ही परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत आहेत.
अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये पहिल्या पेपरच्या दिवशी दोन्ही केंद्रांवर विद्यार्थी व पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर व अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.भाऊसाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.के.जी.पवार यांनी दोन्ही केंद्रांना भेट देऊन सुरक्षिततेचा व बंदोबस्ताचा आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र विठे येथील वैद्यकीय पथक देखील दोन्ही केंद्रांना वैद्यकीय सुविधा देत आहेत.
‘कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा’ या संकल्पनेअंतर्गत दोन्ही केंद्रांवरील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी तथा परिरक्षक मा.श्री.अरविंद कुमावत, विस्तार अधिकारी श्री.बाळासाहेब धोरगे, विस्तार अधिकारी श्रीमती सविता कचरे, केंद्रसंचालक श्री.दिपक बुऱ्हाडे व श्री.शरद तुपविहीरे यांनी केले आहे.
Centre No. 272

Centre No. 803













