November 27, 2025


तालुका विधी सेवा समिती, अकोले राजूर न्यायालय व राजूर-अकोले वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता ११ वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आज कायदेविषयक जागरूकता शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी राजूर न्यायालयाचे न्यायाधीश श्री.एस.यु.न्याहारकर, राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.के.जी.पवार, अकोले तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.श्री.डी.एम.निगळे व सामाजिक कार्यकर्ते श्री.विनय सावंत या मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कायदेविषयक जागरुक राहण्यासंदर्भात प्रबोधन केले.

महिलांची सुरक्षितता व गोपनीयता, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना कायदेविषयक जागृत करणे, NALSA व MSLSA च्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे, विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, पोक्सो कायदा, महिलांचे हक्क आणि कायदेशीर क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींबद्दल शिक्षित करणे ही महत्वाची उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी कायदेशीर शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक राहण्याची गरज आणि वेगवेगळ्या परिस्थितीत ते हक्क कसे वापरता येतील याबद्दल मार्गदर्शन केले.

राजूर न्यायालयाचे न्यायाधीश श्री.एस.यु.न्याहारकर व राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.के.जी.पवार यांनी आपल्या प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीचा दाखला देत आपल्या यशाची यशोगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. जिद्द व चिकाटी माणसाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवत असते असे प्रेरणादाई विचार त्यांनी मांडले.

या कार्यक्रमाप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री.एम.एल.मुठे, संचालक श्री.विजय पवार, प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, राजूर न्यायालयाचा सर्व स्टाफ, राजूर पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ तसेच उच्च माध्यमिक विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे यांनी आभार मानले. ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद तुपविहिरे यांनी या कार्यक्रमाचे प्रभावी असे सूत्रसंचलन केले. सर्व मान्यवरांना रोपटे भेट देऊन विद्यालयातर्फे सन्मानित करण्यात आले.
GO TO HOME PAGE