svm-marathi bhasha gaurav din-image

February 27, 2026


मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध कवी वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. मराठी भाषेचे संवर्धन करणे, तिचा समृद्ध वारसा जोपासणे आणि कुसुमाग्रजांच्या साहित्यातील योगदानाला अभिवादन करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि शासकीय संस्थांमध्ये ग्रंथ दिंडी, निबंध स्पर्धा, कवी संमेलने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा दिवस म्हणजे मराठी भाषेच्या अभिमानाचा आणि गौरवाचा सोहळा मानला जातो.

गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी याउद्देशाने सकाळच्या रम्य वातावरणामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

मराठी विषय शिक्षक श्री.संतराम बारवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कवी कुसुमाग्रज यांच्या मोलाच्या योगदानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. मातृभाषेचा गौरव करण्यासाठी व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिनवादन करण्यासाठी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

मराठी विषय शिक्षक श्री.दीपक पाचपुते यांनी आपल्या मनोगतामध्ये मराठी भाषेचे महत्त्व विषद केले. मराठी ही केवळ महाराष्ट्राची अधिकृत भाषा नसून मराठीला नुकताच ‘अभिजात भाषा’ हा गौरव प्राप्त झाला आहे. हा दिवस केवळ एका भाषेचा उत्सव नसून तो मराठी संस्कृती, तिचा समृद्ध इतिहास आणि साहित्याचा गौरव करण्याचा सोहळा आहे. आपली मायबोली पुढच्या पिढीपर्यंत तितक्याच ताकदीने पोहोचावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे, असेही श्री.दीपक पाचपुते यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये मराठी भाषा आपण कशा प्रकारे जतन व संवर्धित केली पाहिजे याबाबत विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मराठी भाषेचे संवर्धन करणे हे आज आपल्यापुढील मोठे आव्हान आहे, असेही प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी सांगितले.

इयत्ता ९ वी मधील कु.श्रावणी बांबेरे, कु.सृष्टी लांघी व कु.श्रेया दिंडे या विद्यार्थिनींनी यावेळी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.बिना सावंत यांनी केले तर श्री.श्रीकांत घाणे यांनी आभार मानले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व दोन्ही विभागातील विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.