September 10, 2025


राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा (National Science Drama Festival) ही विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेतर्फे (NCSM) आयोजित केली जाते. यामध्ये इयत्ता ६ वी ते १० वी चे विद्यार्थी विज्ञान संकल्पना नाट्यरूपात सादर करतात. सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्जनशीलता वाढवणे हा महत्वाचा उद्देश या स्पर्धा घेण्यामागचा आहे. ही स्पर्धा तालुका, जिल्हा, राज्य आणि विभागीय स्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत होते व विजेत्या संघांना अंतिम राष्ट्रीय महोत्सवासाठी निवडले जाते.

पंचायत समिती व शिक्षण विभाग, अकोले यांच्या वतीने अगस्ति विद्यालय, अकोले येथे आयोजित केल्या गेलेल्या तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेमध्ये ‘मी पृथ्वी बोलते’ या विषयावर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी अभिनयकलेच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार सादरीकरण केले. या स्पर्धेत गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला. विज्ञान शिक्षिका सौ.रोहिणी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही दैदिप्यमान अशी कामगिरी केली. याप्रसंगी तालुका गटशिक्षण अधिकारी मा.अरविंद कुमावत, केंद्रप्रमुख स्वाती आडाणे यांच्यासह शिक्षण विभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सत्यनिकेतन संस्थेचे संचालक श्री.विजय पवार, श्री.विलास पाबळकर, प्राचार्य श्री.बनकर बी.के., पर्यवेक्षक श्री.मालुंजकर जी.बी. या सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना सौ.रोहिणी सानप, श्री.किशोर देशमुख, श्री.कृष्णा बेणके व सर्व विज्ञान शिक्षकांनी मार्गदर्शन केले.


सहभागी स्पर्धक: भांगरे ओंकार अशोक, नवाळी हर्षद बाळू, देशमुख कार्तिक अनिल, भोकनळ आनंद आबासाहेब, बांबेरे श्रावणी भरत, महाले पलक जगदिश, दिंडे श्रेया महेश, धांडे मुग्धा किरण व कडलग पायल युवराज.