January 07, 2026
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम सर्वत्र राबविला जात आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ताज्या व पौष्टिक भाज्यांचा पुरवठा व्हावा, त्यांच्या आहारात पोषकद्रव्यांची भर पडावी, तसेच विद्यार्थ्यांचा निसर्गाशी स्नेह निर्माण व्हावा यासाठी केंद्र शासनाने ‘परसबाग’ उपक्रम सुरू करण्याच्या सुचना शाळांना दिल्या आहेत.
उपक्रमाची मुख्य उद्दिष्टे:
- शाळेतील उपलब्ध जागेच्या आधारे परसबाग तयार करून त्यातून मिळणारा ताजा भाजीपाला विद्यार्थ्यांना पुरविणे.
- परसबागेत स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या भाज्यांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करणे.
- जागा कमी असेल तर लहान ट्रे, कुंड्या, शाळेच्या टेरेस वा भिंतीलगतच्या पट्ट्यामध्येही मायक्रोग्रीन्स (मुळा, मूग, मेथी, बीट, मका, मुळा, मोहरी, सूर्यफूल, वाटाणा, पालक वगैरे) सहजपणे पिकवता येतात.
- शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ते कंपोस्ट, गांडूळ खत तयार करणे व त्याचा वापर करून सेंद्रिय पद्धतीनेच लागवड करणे.
- पाणी बचतीसाठी ठिबक किंवा तुषार सिंचन वापरणे, स्थानिक शेतकरी, पालक, कृषि विशेषज्ञ यांचे सहकार्य घेणे.
- रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर टाळणे.
- वर्षभर परसबागेत निर्मिती व व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, कष्ट आणि जबाबदारीची जाणीव विकसित करणे.
वरील सर्व उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेऊन एक आदर्श अशी परसबाग निर्माण केली आहे. विद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या पश्चिमेच्या बाजूस जवळपास ७ गुंठे क्षेत्र हे परसबागेसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर व उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक श्री.सुरेश शेटे व सचिन लगड यांनी प्रचंड मेहनत घेऊन विद्यार्थी व पालकांच्या सक्रिय योगदानातून या परसबागेची निर्मिती केली आहे. दरवर्षी या पारसबागेतून वांगे, मिरची, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर, भेंडी, कडीपत्ता यासारखा भाजीपाला पिकविला जातो. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकविला जाणारा हा भाजीपाला शालेय पोषण आहार तसेच वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी वापरला जातो.
या परसबागेला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन केलेले आहे. पाणी बचतीसाठी ठिबक व तुषारसिंचन तंत्राचा वापर केला जातो. कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर या परसबागेमध्ये केला जात नाही. परसबागेच्या लगतच गांडूळखत व कम्पोस्टखत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आलेला आहे.
दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी तालुकास्तरीय परसबाग मुल्यांकन समितीने विद्यालयाच्या परसबागेला भेट दिली. पाच सदस्यीय या समितीमध्ये अकोले पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती कचरे मॅडम, महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी श्री.संजय वाकचौरे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.अनिल गायकवाड, आरोग्य विभाग विस्तार अधिकारी श्री.विलास शेळके व कृषी विभाग विस्तार अधिकारी श्री.नंदराम पवार उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी या परसबाग उपक्रमाविषयी समिती सदस्यांना माहिती दिली. सर्व सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून प्राचार्य, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले.



























