गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘रक्षाबंधन’ सण उत्साहात साजरा


रक्षाबंधन हा एक महत्वाचा भारतीय सण आहे, जो भाऊ-बहिणीच्या प्रेमळ आणि पवित्र नात्याचे प्रतीक आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखाची कामना करते, तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. 

गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘रक्षाबंधन’ सण उत्साहात साजरा करण्यात आला. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या दोन्ही विभागांमध्ये स्वतंत्ररीत्या रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रामध्ये उच्च माध्यमिक विभागामध्ये मराठी विषय शिक्षक श्री. एस.आर. बारवकर यांनी रक्षाबंधन सणाचे पौराणिक महत्व विषद केले. उपप्राचार्य श्री. डी.जी. बु-हाडे यांनी रक्षाबंधनाचा इतिहास व महत्त्व समजावून सांगत हा सण फक्त भाऊ- बहिणींपुरता मर्यादित नसून परस्परांच्या रक्षणाची व जबाबदारीची भावना वाढवणारा आहे, हे अधोरेखित केले. शिस्तबद्ध पद्धतीने रांगा करून मुलींनी मुलांना राख्या बांधल्या. त्यानंतर महिला शिक्षिकांनी आपल्या सहकारी शिक्षकांना राख्या बांधून त्यांच्याप्रती आदरभाव प्रकट केला.     

दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागामध्ये देखील रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुलींनी आपल्या भाऊरायांचे औक्षण केले. विशेष उपक्रम म्हणून स्काऊट गाईडच्या मुलींनी व शिक्षिकांनी शाळेच्या आवारातील झाडांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी रक्षाबंधनाचे महत्व विषद करताना सांगितले की रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहीण नात्याचा एक अनोखा सण, ज्यामध्ये बहिणी आपल्या भावांना रखीचा धागा बांधतात, परंतु हा धागा मैत्रीच्या भावनेने देखील जोडला जातो, ज्याला आपण मैत्रीचा धागा देखील म्हणतो. रक्षाबंधन हा विद्यार्थ्यांसाठी प्रेम आणि संरक्षणाचे बंधन साजरे करण्याचा एक आनंददायी प्रसंग आहे. शाळेमध्ये रक्षाबंधन साजरा केल्याने विद्यार्थ्यांमध्ये सौहार्दपूर्ण मैत्रीची भावना निर्माण होते असेही मा. प्राचार्यांनी सांगितले. पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर यांनी देखील विद्यार्थ्यांना एकमेकांबद्दल प्रेम, सन्मान आणि आदर ठेवण्याचा संदेश दिला.

यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांनी या उत्सवात सहभागी होत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला.

PHOTO GALLERY

Go to Home Page