February 25, 2026
श्री गुरु तेग बहादूर साहेबजी हे शीख धर्माचे नववे गुरु असून त्यांना त्यांच्या असीम त्यागामुळे ‘हिंद दी चादर’ म्हटले जाते. १६२१ मध्ये अमृतसर येथे जन्मलेल्या गुरु साहेबांनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या जुलूमी राजवटीत काश्मिरी पंडितांच्या आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. “भय काहूँ को देत नहि, नहि भय मानत आन” (कोणाला घाबरवू नका आणि कोणाला घाबरू नका) हा मौल्यवान संदेश देणाऱ्या गुरु साहेबांनी सत्यासाठी दिल्लीच्या चांदनी चौक येथे १६७५ मध्ये बलिदान दिले. त्यांच्या या महान बलिदानाची आठवण म्हणून तिथे गुरुद्वारा शीशगंज साहिब बांधण्यात आलेले आहे. त्यांचे ११५ श्लोक पवित्र ‘गुरु ग्रंथ साहिब’ मध्ये संकलित आहेत.
श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सरकारने हे वर्ष ‘३५० वे शहीदी समागम वर्ष’ म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. श्री गुरु तेग बहादूर साहेबजींचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान यांचे स्मरण होण्याकरिता राज्यशासनाने राज्यातील शाळांना विविध कार्यक्रमांचे अयोजन करण्याचे परिपत्रक काढून आदेश दिलेले आहेत.

रांगोळी स्पर्धा:
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फुर्तपणे या स्पर्धेमध्ये भाग घेऊन श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. अतिशय सुंदर व कल्पक रांगोळीच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट उलगडण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला.
श्री.संतराम बारवकर, सौ.बीना सावंत, कलाशिक्षक श्री.रावसाहेब पांडे व त्याचबरोबर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी या स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन केले होते. अकोले पंचायत समितीचे केंद्रप्रमुख श्री.सुनिल घुले, केंद्रप्रमुख श्रीमती स्वाती आडाणे व विशेष शिक्षिका श्रीमती सीमा कानवडे यांनी या रांगोळी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी. मालुंजकर व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.




भक्तीगीत समूहगान:
दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता विद्यालयामध्ये श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या जीवनपटावर आधारित भक्तिगीताचे समूहगान करण्यात आले. सकाळच्या अतिशय प्रसन्न व भक्तिमय अशा वातावरणामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या जवळपास १००० विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी या भक्तिगीताचे सामुहिक गायन केले. तत्पूर्वी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख यांनी श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा जीवनप्रवास, संघर्ष व बलिदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी. मालुंजकर व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समूहगान केले.

व्हिडीओ डॉक्युमेंटरी सादरीकरण:
दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित व्हिडीओ डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या. विद्यालयात उपलब्ध असणाऱ्या तीन Inractive व एका स्मार्ट बोर्डवर ह्या डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या. ज्येष्ठ शिक्षक श्री.धनंजय पगारे, श्रीमती कविता वाळुंज व श्रीमती रीना राठोड यांनी यासंदर्भात नियोजन करून विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

वक्तृत्व स्पर्धा:
दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मराठी विषय शिक्षक श्री.दिपक पाचपुते यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन केले. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु.दिव्या वालझाडे, कु.पलक महाले व कु.मुग्धा धांडे या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून आपल्यामधील वक्तृत्व कलागुण सिद्ध केले.

निबंध स्पर्धा:
दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ५ वी ते ९ वी तसेच ११ वी च्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला होता. सर्व वर्गशिक्षकांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते.











