December 20, 2025
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, त्यांच्यामध्ये सर्जनशीलता आणि संशोधनाची आवड वाढीस लावणे व त्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन व्यावहारिक ज्ञानाचा वापर करण्याची संधी देणे या प्रमुख उद्देशांनी गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.
जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती अकोले व विज्ञान-गणित अध्यापक संघ अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे अकोले तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शन नुकतेच माडर्न हायस्कूल, अकोले या ठिकाणी भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी श्रीहर्षा गौराम बिडवे या इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने सहावी ते आठवी या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून तालुक्यामध्ये विद्यालयाचा लौकिक वाढविला. अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे, गटशिक्षण अधिकारी श्री.अरविंद कुमावत व विज्ञान-गणित अध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीहर्षाचा गौरव करण्यात आला. या कामगिरीमुळे श्रीहर्षाची जामखेड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
श्रीहर्षा बिडवे हिने क्षारीय सक्रिय कार्बन मातीचे पाणी शुद्ध करणारे यंत्र (Alkaline Clay Carbon Water Filter) तयार केले असून पर्यावरण व मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. श्रीहर्षा हीने अत्यंत कल्पकतेने व सर्जनशीलतेने तयार केलेल्या या उपकरणामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीहर्षा ही राजूर येथील प्रथितयश डॉक्टर श्री.गौराम बिडवे यांची कन्या आहे. आई-वडिलांच्या प्रेरणेने व विज्ञान शिक्षिका श्रीमती रोहिणी सानप यांच्या मार्गदर्शनाने तिने विज्ञान क्षेत्रात हे दैदिप्यमान यश मिळविले आहे.
सत्यनिकेतन संस्था व गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने श्रीहर्षाचा गौरव करण्यात आला. सत्यनिकेतन संस्थेचे सचिव मा.एम.एल.मुठे, कोषाध्यक्ष मा.श्री.विवेकजी मदन, प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे तसेच सत्यनिकेतन संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व विद्यालयाच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रीहर्षाचे कौतुक केले व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

















