October 15, 2025


माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन‘ म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि समाजात वाचन संस्कृतीचा प्रसार करणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या निमित्ताने शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ज्ञानाची आणि वाचनाची आवड लक्षात घेऊन हा दिवस वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी समर्पित केला गेला आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त आवांतर वाचन होणे आवश्यक आहे. आवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही आवांतर वाचनाचा उपयोग होतो. वाचनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास साध्य करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

‘गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर’ येथे आज १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन‘ म्हणून साजरा केला गेला. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्रांगणात एकत्र करून त्यांना वाचनासाठी पुस्तके देण्यात आली. अतिशय प्रसन्न अशा वातावरणात विद्यार्थी अक्षरशः वाचनामध्ये दंग झाले होते. वेगवेगळ्या लेखकांची वेगवेगळी पुस्तके वाचण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाबद्दलची उत्सुकता व आवड दिसून आली.

याप्रसंगी जेष्ठ शिक्षक श्री. दिपक पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना या दिनाचे व वाचनाचे महत्व सांगितले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर, ग्रंथपाल श्री.एस.डी.घुले, श्री.के.व्ही.देशमुख, श्री.धनंजय पगारे, श्री.एस.व्ही.घाणे, सौ.व्ही.के.सोनवणे, श्रीमती के.एस.वाळुंज व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी इयत्ता ८ वी ची विद्यार्थिनी कु.दिव्या वालझाडे व इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी कु.पलक महाले या दोन्ही विद्यार्थिनींनी भाषण केले.

“पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. वाचनाने माणसाचे आयुष्य बदलते. पुस्तक वाचल्यानंतर मला मनस्वी खूप आनंद मिळतो. लहानपणापासून पुस्तक वाचनाची आवड असल्याने मी आज आत्मविश्वासाने चांगले भाषण करू शकते” असे मत कु.दिव्या वालझाडे हिने आपल्या मनोगतात व्यक्त केले.

“विश्वास नांगरे पाटील यांचे ‘मन मे है विश्वास’ हे पुस्तक मी वाचले व त्यांची प्रेरणा घेऊन मीही भविष्यात चांगली वाटचाल करण्याचे ठरविले आहे. प्रत्येकाने आठवड्यात किमान एकतरी पुस्तक वाचले पाहिजे, ‘वाचाल तर वाचाल’ हे आपण आपल्या मनाशी पक्के ठरविले पाहिजे” असे मत कु.पलक महाले हिने आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.