October 04, 2025


वनक्षेत्रपाल राजूर (भ.व.का.) व गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर यांचे संयुक्त विद्यमाने ‘वन्यजीव सप्ताह’ उपक्रमांतर्गत नाशिक येथील नामांकित ‘इको’ या संस्थेचे संचालक तथा वन्यजीव अभ्यासक श्री.वैभवजी भोगले यांचे आज विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी राजूर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.डी.डी.पडवळे, वनपाल श्री.डोंगरे साहेब, प्राचार्य श्री.बी.के.बनकर, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर, पत्रकार श्री.प्रकाशजी महाले सर व त्याचबरोबर वनक्षेत्रपाल राजूर यांचे कार्यालयातील सर्व वनरक्षक व वनमजूर उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व त्यांचा यथोचित सन्मान केला. वनविभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे प्राचार्यांनी कौतुक केले. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.डी.डी.पडवळे यांनी ‘वन्यजीव साप्ताह’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.      

यावेळी बोलताना प्रमुख व्याख्याते श्री.वैभवजी भोगले यांनी वन्यप्राणी, वन्यप्राण्यांपासून करावयाचा बचाव, वन्यजीव संरक्षण व संवर्धन, मनुष्य व प्राणी संघर्ष यासारख्या अनेक मुद्यांवर संवाद साधत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मानवी लोकसंख्या वाढत असताना मानव-वन्यजीव संघर्ष अधिक गंभीर आणि व्यापक होत चालले आहे. मानवाने प्राण्यांचे अधिवास नष्ट केले आहेत. दिवसेंदिवस वनक्षेत्र कमी होत चालले असून बिबट्यांनी मानवी वस्तीकडे कूच केलेली आहे. वन्यप्राण्यांचे हक्क मानवाने हिरावून घेत जंगलतोड केली व तेथे काँक्रिटची घरे झाली. बिबट्याचे अन्न नाहीसे झाले, पिण्यासाठी पाणी नाही अशी अवस्था निर्माण झाल्यानेच बिबट्या मानवी वस्तीमध्ये आला आहे. वन्यजीव आणि जैवविविधता कमी होत आहे आणि यावर मात करण्यासाठी अधिवास संरक्षण आणि पुनर्स्थापनेची तातडीने गरज असल्याचे प्रतिपादन वैभवजी भोगले यांनी केले. सापांच्या विविध जाती, सर्पदंश, प्रथमोपचार व त्यावर करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट गाईड व एन.सी.सी. या तीनही विभागांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले. ज्येष्ठ शिक्षक श्री.दिपक पाचपुते यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. श्री.एस.व्ही.घाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

GO TO HOME PAGE