December 1, 2025


एचआयव्ही संसर्गाबाबत जगभरातील लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. HIV च्या संसर्गामुळे होणारा साथीचा रोग एड्स (AIDS) म्हणून ओळखला जातो. १९८८ मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक स्तरावर एचआयव्ही-एड्सचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम हाती घेतले आणि १९९७ मध्ये ‘जागतिक एड्स मोहिमे’अंतर्गत संसर्ग, प्रतिबंध आणि शिक्षण यावर काम करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर जगभरात ‘जागतिक एड्स दिन’ साजरा केला जाऊ लागला.

गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ विज्ञान-विषय शिक्षक श्री. किशोर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना एड्सविषयक मुलभूत माहिती, प्रतिबंधक उपाययोजना आणि जागरूकता याबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सानप मॅडम यांनी एड्स दिनाचे उद्दिष्ट, सुरक्षित व जबाबदार वर्तनाचे महत्त्व तसेच समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या उपायांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याविषयक सजगता, संवेदनशीलता आणि संबंधांबाबत काळजीपूर्वक व जबाबदार दृष्टीकोन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर यांचेसह माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. कला शिक्षक श्री.आर.पी.पांडे यांनी आकर्षक फलकलेखन केले. कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचा संदेश यशस्वीरीत्या पोहोचविण्यात आला.