November 7, 2025
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या “वंदे मातरम” या गीतास स्वातंत्र्यलढ्यात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. ‘आनंदमठ’ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्तुतीचे प्रतिक असून स्वातंत्र्यलढ्यातील असंख्य क्रांतीकारकांना प्रेराणादाई ठरलेले आहे. या गीतास आज ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाले.
डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव जिल्हा समिती यांचे आदेशाने क्रांतिकारक राघोजी भांगरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजूर यांच्या उत्कृष्ठ अशा नियोजनाखाली “वंदे मातरम” गीताचा १५० वा वर्धापन दिन कार्यक्रम आज पार पडला. अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलामध्ये हा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास तहसीलदार श्री.सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी श्री.अमर माने, प्रकल्पाधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे, कौशलाचार्य पुरस्कार विजेत्या सौ.पुष्पाताई निगळे, त्याचरोबर अकोले तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा-कॉलेज व तांत्रिक संस्थांचे प्राचार्य, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय व भारतमातेच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात “वंदे मातरम” गीताच्या सामुहिक गायनाने करण्यात आली. औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूरचे गटनिदेशक श्री.अर्जुन नागरे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. तहसीलदार तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सिद्धार्थ मोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये ‘वंदे मातरम’ या गीताचे महत्व विषद केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूरच्या विद्यार्थ्यांनी छोट्याशा नाटिकेद्वारे ‘वंदे मातरम’ गीताचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक श्री.संतराम बारवकर यांनी ओघवत्या शैलीमध्ये ‘वंदे मातरम’ गीतामधील प्रमुख शब्दांचा अर्थ अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने विषद केला. श्री.एस.के.मंडलिक यांनी सर्वांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब देशमुख व सर्व स्टाफ, गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य व सर्व स्टाफ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूरचे प्राचार्य श्री.उमेश पालवे, गटनिदेशक श्री.अर्जुन नागरे व सर्व कर्मचारी या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.









Also see: सर्वोदय ‘वंदे मातरम’ १५० वा वर्धापन दिन










