

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले हा आदिवासीबहुल तालुका. तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या कळसुबाई शिखराच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले राजूर हे गाव शिक्षण व व्यापाराचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत स्व.रा.वि.पाटणकर, स्व.सावित्रीबाई मदन व स्व.बापूसाहेब शेंडे या त्रिमुर्तींनी १९५० साली ‘सत्यनिकेतन’ संस्थेची स्थापना केली.
पुढे सन १९५८ साली सर्वोदयी विचारसरणीतून व सर्वोदयी चळवळीतून शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. सन १९५८ पासून आजतागायत ‘गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय’ हे अखंडपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. आज हे विद्यालय शिक्षणाचे महत्वाचे केंद्र म्हणून नावलौकिकास आलेले आहे. इयत्ता ५ वी ते १२ वी च्या वर्गांमध्ये जवळपास १८०० विद्यार्थी या विद्यालयात शिक्षण घेत आहेत.
आमच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्ण इतिहासाचे तेजस्वी तारे असलेल्या प्रिय माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो….
गुरुवर्य रा.वि.पाटणकर, सावित्रीबाई मदन व बापूसाहेब शेंडे या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या व गांधीवादी विचारांचा वारसा लाभलेल्या आमच्या विद्यालयाच्या सुवर्णस्मृतींनी नटलेल्या प्रांगणातून आपण उंच भरारी घेतली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही आज जगाच्या कोणत्याही दिशेला असलात तरी आमच्या मनातील आपुलकीचा धागा अजूनही तितकाच दृढ आहे. तुमच्या यशाच्या आकाशात सदैव तेजाचा सूर्य तळपत राहो आणि आयुष्याच्या वाटचालीत आनंदाची फुले फुलत राहोत, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.
चला, पुन्हा एकदा या नात्यांना नवसंजीवनी देऊया! आपल्या शाळेशी पुन्हा जोडले जाऊया!
आजच नोंदणी करा आणि आपल्या शाळेशी कायमचे जोडलेले रहा.










