March 05, 2026
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रम (National Programme for Control of Blindness) हा भारत सरकारचा उपक्रम असून याची सुरुवात १९७६ मध्ये अंधत्वाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे मुख्य लक्ष्य देशातील अंधत्वाचे प्रमाण ०.३ टक्क्यांपर्यंत खाली आणणे हे असून यामाध्यमातून डोळ्यांच्या आरोग्याबाबत व्यापक जनजागृती केली जाते. या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि कृत्रिम भिंगारोपण केले जाते. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीदोषाची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वितरीत केले जातात. काचबिंदू आणि मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या दृष्टीदोषावरही या उपक्रमांतर्गत मोफत उपचार केले जातात.
केंद्रसरकारच्या NPCB या उपक्रमांतर्गत गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मोफत दृष्टीदोष निवारण व उपचार कार्यक्रम राबविण्यात आला. ग्रामीण रुग्णालय राजूर येथील नेत्रचीकीत्सक डॉ.राहुल फडके यांच्याकडून पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास ३० विध्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. पुढच्या टप्प्यामध्ये देखील आणखी काही विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल. विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच नेत्रदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुढील उपचार देखील ग्रामीण रुग्णालय राजूर यांचेमार्फत मोफत केले जाणार आहे.
शासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे व पर्यवेक्षक श्री.जी.बी. मालुंजकर यांनी कौतुक केले व राजूर ग्रामीण रुग्णालयाचे आभार मानले. ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद तुपविहिरे, श्रीमती कविता वाळुंज व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली.













