June 21, 2026
दरवर्षी २१ जून रोजी जगभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचा मुख्य उद्देश जगभरातील लोकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूक करणे, ताणतणाव कमी करणे आणि योगाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकतेच्या सूत्रात बांधणे हा आहे. यादिवशी शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये सामूहिक योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे आयोजन करून निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला जातो.
गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ‘२१ जून- आंतरराष्ट्रीय योग दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या अतिशय प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी मानवी जीवनामध्ये योग व ध्यानधारणेचे महत्व विषद केले. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. योग ही भारतीय संस्कृतीची मौल्यवान देणगी असून, तो जीवनशैलीचा एक भाग झाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर व ज्येष्ठ शिक्षक श्री.धनंजय लहामगे यांनी स्वतः विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान-धारणा सादर करत योगाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून उलगडून दाखवले. दोघांनीही विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यार्थ्यांनी देखील अतिशय उत्स्फुर्तपणे व आनंदाने सहभाग घेत योगाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. ज्येष्ठ शिक्षक श्री.धनंजय पगारे यांनी देखील प्रत्येक आसनांची माहिती अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने विषद केली.
विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे विद्यार्थी, सर्वोदय व नवभारत छात्र निवासची मुले व सावित्रीबाई कन्या निवासच्या मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.











