October 15, 2026
दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक हात धुवा दिन (Global Handwashing Day) साजरा केला जातो. गरीब आणि विकसनशील देशांमध्ये आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी युनिसेफने (UNICEF) या मोहिमेची सुरुवात केली. संयुक्त राष्ट्र महासभेने २००८ मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोम येथील ‘जागतिक जल सप्ताहात’ हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्याचे घोषित केले. याच वर्षी झालेल्या पहिल्या मोहिमेत जगातील ७० पेक्षा जास्त देशांमधील सुमारे २०० दशलक्ष (२० कोटी) लोकांनी साबणाने हात धुवून यात सहभाग घेतला होता.
आपल्या अवतीभोवती असणारे अदृश्य जिवाणू दैनंदिन कामांदरम्यान हाताला चिकटतात आणि जेवणाद्वारे पोटात जाऊन आजार पसरवतात; म्हणूनच खोकल्यावर, शौचास जाऊन आल्यावर, तसेच स्वयंपाक व जेवणापूर्वी आणि नंतर साबणाने स्वच्छ हात धुणे किती गरजेचे आहे, याबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात माध्यमिक विद्यालयातील स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी सौ. रीना राठोड यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या योग्य पद्धतीच्या विविध पायऱ्यांबाबत मार्गदर्शन केले. साबण आणि स्वच्छ पाण्याने हात व्यवस्थित कसे धुवावेत, तसेच जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुणे का आवश्यक आहे, याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. हातांची योग्य स्वच्छता राखल्यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यास मदत होते, याबाबतही यावेळी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
‘स्वच्छ हात, निरोगी जीवन!’ हा संदेश देत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजले आणि आरोग्यविषयी जागरूक राहण्याची प्रेरणा मिळाली.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


हात केव्हा धुवावेत?
२. स्वयंपाक करण्यापूर्वी आणि स्वयंपाक केल्यानंतर.
३. जेवण्यापूर्वी आणि जेवण झाल्यानंतर.
४. कोणत्याही आजारी व्यक्तीला भेटण्यापूर्वी आणि भेटून आल्यानंतर.
५. शौचालयाचा वापर केल्यानंतर.
हात स्वच्छ धुण्याच्या ९ शास्त्रीय पायऱ्या (Steps):
२. साबण लावा: हाताला पुरेशा प्रमाणात साबण किंवा हँडवॉश लावा.
३. तळवे घासा: दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर व्यवस्थित घासून घ्या.
४. मागील भाग: एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या पाठीमागच्या भागावर ठेवून दोन्ही हात आलटून-पालटून घासा.
५. बोटांमधील जागा: बोटे एकमेकांत (बेचक्यात) घालून बोटांच्या कडा स्वच्छ करा.
६. अंगठे स्वच्छ करा: दोन्ही हातांचे अंगठे मुठीत धरून गोल फिरवून घासून घ्या.
७. नखे आणि बोटांची टोके: तळहातावर बोटांची टोके आणि नखे वर्तुळाकार पद्धतीने घासा.
८. हात धुवा: साबणाचा संपूर्ण फेस निघून जाईपर्यंत हात पाण्याने स्वच्छ धुवा.
९. हात कोरडे करा: शेवटी एका स्वच्छ रुमालाने किंवा टॉवेलने आपले हात पूर्णपणे कोरडे करा.
लक्षात ठेवा: स्वच्छ हात, हेच निरोगी जीवनाचे पहिले पाऊल आहे!










