October 17, 2026


गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी झाडापाल्यांच्या सहाय्याने जमिनीवर प्राण्यांची चित्रे काढून एक आगळावेगळा ‘जंगल सफारी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीपणे राबविला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम निर्माण करणे, वन्यजीवांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेचे महत्त्व समजावून सांगणे हा होता.

या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही कृत्रिम रंगांचा वापर न करता, केवळ झाडांची पाने, फांद्या, फुले, गवत आणि सुका पालापाचोळा यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केला. विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी वाघ, सिंह, हत्ती, हरीण, साप, मोर, पोपट, फुलपाखरू यांसारख्या विविध वन्यजीवांच्या अत्यंत हुबेहूब आणि आकर्षक प्रतिकृती जमिनीवर साकारल्या. वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या पानांचा कल्पकतेने वापर करून प्राण्यांचे डोळे, केस आणि त्वचेचा पोत दाखवण्याचे विद्यार्थ्यांचे कौशल्य थक्क करणारे होते.

स्काऊट गाईडच्या तत्त्वांचे पालन करत विद्यार्थ्यांनी गटागटाने काम केल्यामुळे त्यांच्यातील सांघिक भावना, नेतृत्वगुण आणि सहकार्याची वृत्ती दिसून आली. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन वन्यजीव संरक्षण आणि निसर्गाचे महत्त्व समजून सांगणारा हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला. मैदानावर अवतरलेली ही अनोखी ‘जंगल सफारी’ पाहण्यासाठी विद्यालयातील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी जंगलातील विविध वृक्ष, वनस्पती, पक्षी आणि वन्यजीव यांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच जंगलाचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्व समजून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचे जवळून निरीक्षण करण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे व उपमुख्याध्यापक श्री.संजय व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांच्या या अफाट कल्पकतेचे व कौशल्याचे भरभरून कौतुक केले. स्काऊट गाईड प्रमुख श्री.धनंजय लहामगे व सौ.रीना राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठ शिक्षिका सौ.वंदना सोनवणे, एनसीसी प्रमुख श्री.संजय देशमुख व हरित सेना प्रमुख श्री.श्रीकांत घाणे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी जंगलाचे महत्त्व, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन यांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना राजगिऱ्याचे लाडू देण्यात आले. निसर्गाशी नाते जोडणारा हा कलात्मक उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.