May 20, 2026


गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक श्री.संतोष नवलेश्री.सचिन लगड यांनी नुकत्याच अकोले येथे पार पडलेल्या जनगणना २०२७ प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन फिल्ड ट्रेनर म्हणून अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली. दोघांनीही आपल्या प्रभावी संवाद कौशल्याने व उत्कृष्ठ संगणकीकृत सादरीकरणाच्या माध्यमातून प्रगणक तसेच पर्यवेक्षकांना जनगणना मोहिमेचे प्रशिक्षण देऊन त्यांना सखोल मार्गदर्शन केले. ‘फिल्ड ट्रेनर’ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर दोघांनाही अहिल्यानगर येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते.

श्री.संतोष नवले व श्री.सचिन लगड हे दोघेही राज्यशास्त्र व इतिहास विषय-शिक्षक असून विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. तालुकास्तरावरील जनगणना मोहिमेसाठी ‘फिल्ड ट्रेनर’ म्हणून या दोघांनी आपली निवड सार्थ ठरवत तालुक्यामध्ये विद्यालयाचा नावलौकिक वाढविला.

या जनगणना मोहिमेसाठी एकूण ४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना टप्प्याटप्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावर्षीची जनगणना पारंपरिक कागद-पेनऐवजी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने माहिती अधिक अचूक, सुरक्षित व वेगवान पद्धतीने संकलित होणार आहे. ही जनगणना अकोले तालुक्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.

जनगणना दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात इमारत व घरगणना केली जाणार आहे. ही प्रक्रिया जलद व पारदर्शक असून हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने अचूक माहिती नोंदवणे आवश्यक आहे. प्रशिक्षणामुळे प्रगणक व पर्यवेक्षक अधिक सक्षमपणे माहिती संकलित करून जनगणना यशस्वी करत आहेत.

या जनगणना मोहिमेसाठी विद्यालयातील शिक्षक श्री.सुरेश शेटे, श्री.अमोल तळेकर, श्री.विकास जोरवर, श्री.संतराम बारवकर व श्री.महेश दिंडे यांनी देखील रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता ‘प्रगणक’ म्हणून प्रभावीपणे कामकाज पार पाडले. श्री.संतोष नवले व श्री.सचिन लगड व त्याचबरोबर सर्व प्रगणकांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर व उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक करत हे आव्हानात्मक राष्ट्रीय कार्य यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

श्री.संतोष नवले श्री.सचिन लगड


GO TO HOME PAGE