svm rajur- nutripathshala program-image
June 24, 2026

न्युट्रीपाठशाळा उपक्रम

न्युट्रीपाठशाळा (NutriPathshala) हा HarvestPlus Solutions या संस्थेने शालेय विद्यार्थ्यांच्या शाश्वत आरोग्यासाठी सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना विशेष पूरक आहार दिला जातो, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या पोषक घटकांनी समृद्ध (biofortified) असलेल्या लोहयुक्त बाजरी आणि जस्तयुक्त (zinc) गव्हाचा समावेश केला जातो.

यासोबतच, ‘पोषण की पढाई‘ या उपक्रमाद्वारे मुलांना संतुलित आहार, आरोग्यदायी सवयी आणि स्वच्छतेचे धडे दिले जातात. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये राबवला जाणारा हा प्रकल्प मुलांचे आरोग्य, आकलनशक्ती आणि शाळेतील उपस्थिती सुधारण्यात मोलाची भूमिका बजावत आहे.


सर्वोदय विद्यालयात ‘द न्यूट्री पाठशाळा’ (The Nutri Pathshala) उपक्रमाचा शुभारंभ….

HarvestPlus Solutions, COFFCO आणि Agrozee Organics Pvt. Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ‘The NutriPathshala’ या अभिनव पोषण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराच्या सवयी आणि पोषणाविषयी जनजागृती निर्माण करणे हा आहे. या प्रकल्पांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बायोफोर्टिफाइड आणि पौष्टिक मिलेट्सपासून तयार केलेले लाडू, कुकीज, न्यूट्री बार आणि खाखरा यांसारखे पोषणमूल्यांनी समृद्ध खाद्यपदार्थ नियमितपणे वितरित करण्यात येणार आहेत.

यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याला ‘न्यूट्री डायरी’ देण्यात येणार असून, त्यामध्ये त्यांच्या आहाराच्या सवयी, पोषणविषयक माहिती आणि आरोग्याशी संबंधित उपक्रमांची नोंद ठेवता येईल. या अनुषंगाने शाळेमध्ये ‘आरोग्य क्लब’ (Health & Nutrition Club) स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी आकर्षक आणि शैक्षणिक पोषणविषयक भित्तीचित्रांनी (Classroom Painting) सजविलेला विशेष वर्ग विकसित करण्यात येईल. हा वर्ग विद्यार्थ्यांसाठी पोषण शिक्षणाचे प्रेरणादायी केंद्र ठरणार आहे.

याशिवाय विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी पोषण, स्वच्छता, संतुलित आहार, बायोफोर्टिफाइड पिकांचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैली या विषयांवर विविध जनजागृती व प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘The  न्यूट्री पाठशाळा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्य विकासासाठी, कुपोषण कमी करण्यासाठी आणि भविष्यात निरोगी व सुदृढ पिढी घडविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील २० शाळांमधील सुमारे ५,००० विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार असून, या उपक्रमाची सुरुवात गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयापासून करण्यात आली आहे. या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये पोषणाविषयी जागरूकता निर्माण करून त्यांचे आरोग्य अधिक सक्षम व सुदृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी Agrozee Organics Pvt. Ltd. च्या प्रोजेक्ट मॅनेजर Miss. स्वाती खेडेकर तसेच त्यांच्या टीमने विद्यालयाला भेट देऊन ‘द न्यूट्री पाठशाळा’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे व पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.या उपक्रमाचे Brand Ambassador लोकप्रीय कूक, उद्योजक व लेखक श्री.संजीव कपूर हे स्वतः पुढील आठवड्यात सर्वोदय विद्यालयाला भेट देणार आहेत.

svm rajur- nutripathshala program-team


खाद्यपदार्थ व ‘न्युट्री डायरी’ वितरण

सोमवार दिनांक २९ जून २०२६ रोजी माध्यमिक विभागाच्या इयत्ता ५ वी ते १० च्या जवळपास ८०० विद्यार्थ्यांना आज ‘आयर्न मल्टी मिलेट लड्डू’, ‘मिलेट न्युट्रि बार’ व ‘मिलेट जीरा खाकरा’ या पौष्टिक खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला ‘न्यूट्री डायरी’ देण्यात आली. प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी विद्यार्थ्यांना डायरी संदर्भात माहिती दिली. याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.विजय पवार, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह यावेळी पहावयास मिळाला.