October 03, 2026
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांचे संयुक्त विद्यमाने न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, अहिल्यानगर येथे नुकतीच भव्य जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिकणारा विद्यार्थी चेतन खंडू कुंदे याने १९ वर्षाखालील गटामध्ये नेत्रदीपक कामगिरी करत विद्यालयाचा लौकिक वाढविला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पाथर्डीच्या स्पर्धकाला चेकमेट करत चेतनने प्रथम क्रमांक मिळविला. या कामगिरीमुळे चेतनची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अकोले तालुक्यातील राजूर जवळील टिटवी या आदिवासी गावातील शेतकरी कुटुंबामधील व शासकीय आदिवासी वसतिगृहातील या विद्यार्थ्याने बुद्धीबळासारख्या खेळामध्ये जिल्हास्तरावर अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला क्रीडा शिक्षक श्री.तारू व्ही.टी. व श्री.आरोटे जे.आर. या दोघांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मान्यवरांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले.
सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.एम.एन.देशमुख, सचिव श्री.एम.एल.मुठे व कोषाध्यक्ष श्री.विवेकजी मदन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बु-हाडे, उपमुख्याध्यापक श्री.संजय व्यवहारे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांनी चेतनचे अभिनंदन करून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवून पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेल्या इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी चेतन कुंदे याचा पंचायत समिती शिक्षण विभागाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी श्री.झावरे साहेब, केंद्रप्रमुख श्री.दिपक बोऱ्हाडे, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, श्री.युवराज तळपे यांचेसह अनेक शिक्षक उपस्थित होते.











