October 03, 2026


सर्वोदयमध्ये एकल महिलांच्या मुलांसाठी बालसंगोपन योजना अभियान….

महाराष्ट्र शासनाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही एकल पाल्य, अनाथ आणि संकटग्रस्त बालकांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी आर्थिक मदतीकरिता कार्यरत आहे. एकल महिलांच्या मुलांसाठी राज्य सरकारने बालसंगोपन योजना तयार केली असून या अंतर्गत मुलांना दरमहा २२५० रुपये राज्य शासन देत असते. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अहिल्या एकल समितीच्या माध्यमातून अकोले तालुक्यात हे अभियान अतिशय प्रभावीपणे राबविले जात आहे.

श्री समर्थ सेवा ट्रस्ट, अहिल्या एकल महिला हक्क संरक्षण समिती व गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे एकल महिला पालकांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली.

या अभियानांतर्गत बालसंगोपन योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले. एकल महिलांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना, विविध व्यावसायिक प्रशिक्षणे, आरोग्य शिबिरे, कायदेविषयक सल्ला, एकल महिला डेटा बँक यासारख्या अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. राजूर व राजूर परिसरातील एकल महिलांनी अतिशय उत्स्फुर्तपणे व मोठ्या प्रमाणात या अभियानात सहभाग नोंदविला.

प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी व पालकांचे स्वागत केले. समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. समितीच्या वतीने “रविवारची शाळा” या उपक्रमाची माहिती-पुस्तिका विद्यालयाला देण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य श्री.दिपक बु-हाडे, उपमुख्याध्यापक श्री.संजय व्यवहारे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री.श्रीनिवास रेणूकदास, श्री समर्थ सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.रूपाली रेणूकदास, प्रयोगशील शिक्षिका श्रीमती शीतल आवारी, श्रीमती सिंधू धोंगडे, श्रीमती जोत्सना देशमुख व श्री.तुकाराम कोकतरे या मान्यवरांनी हे अभियान यशस्वीरीत्या पार पाडले.