November 26, 2025 (माध्यमिक)
December 17, 2025 (उच्च माध्यमिक)
आजच्या वेगवान जीवनशैलीत विद्यार्थ्यांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. अशा परिस्थितीत शालेय आरोग्य तपासणी शिबिराचे महत्व अधोरेखित करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे त्यांच्या शैक्षणिक यशाशी थेट जोडलेले आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने ही शिबिरे समाजात आरोग्यक्रांती घडवू शकतात.
याच अनुषंगाने गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ञ डॉक्टरांच्या पथकांनी मुला-मुलींची स्वतंत्ररीत्या आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचा अहवाल सादर केला. ५ वी ते १२ वीच्या एकूण १५०० विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांचा अहवाल निरोगी व आरोग्यदायी आला असून, कुठल्याही गंभीर आजाराची नोंद नाही असे डॉक्टरांच्या अहवालात दिसून आले.
‘विद्यार्थ्यांचे आरोग्य वेळेवर तपासणे हे त्यांच्या शारीरिक व शैक्षणिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. WHO च्या मते सर्वसाधारणपणे ५-१७ वयोगटातील मुला-मुलींमध्ये पौष्टिक घटकांची कमतरता, डोळ्यांचे त्रास आणि मानसिक ताण या समस्या आहेत. शालेय आरोग्य शिबिरांद्वारे या समस्यांना प्रारंभिक अवस्थेत ओळखून उपाययोजना करता येते. शालेय आरोग्य शिबिराचे महत्व केवळ आजार बघण्यापुरते मर्यादित नाही तर ते एक समग्र आरोग्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी आहे’, असे मत अकोले येथील प्रथितयश डॉक्टर संदीप कडलग यांनी याप्रसंगी मांडले.
डॉ.संदीप कडलग, डॉ.पूनम कोटकर व डॉ.सोनाली पापळ यांनी इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ.कोळपकर व डॉ.शेलार, आरोग्य सहाय्यक डॉ.शेळके व झांबरे, LHV डॉ.कोंडार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.पांडे, डॉ.कचरे, डॉ.राम भवारी, डॉ.आहेर व डॉ.दिपाली गुंजाळ तसेच आरोग्य कर्मचारी विमल परते, पार्वती गायकवाड, आशा शेळके, सीमा पंडित, भारती साळुंके, शुभांगी शिंदे व गट प्रवर्तक आरती बिडवे यांनी इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे व पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.















