September 08, 2025
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (World Literacy Day) दरवर्षी ८ सप्टेंबरला संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरुवात १९६६ सालापासून झाली. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि जगभरातील लोकांचे शिक्षणाकडे लक्ष वेधणे असा आहे. एक साक्षर आणि सक्षम समाज घडविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. जागतिक साक्षरता दिवसानिमित्ताने जगभर शिक्षणाविषयी जनजागृती केली जाते.
२०२५ च्या जागतिक साक्षरता दिनाची थीम ‘डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे‘ आहे. आपण प्रगती करत असताना शिक्षण ही डिजिटल प्रगती, समावेशन आणि सुरक्षित भविष्य घडवणारी शक्ती आहे हा यामागचा उद्देश आहे.
आज ९ सप्टेबर २०२५ रोजी गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. स्काऊट गाईड प्रमुख श्री.धनंजय लहामगे व श्रीमती रीना राठोड यांच्या पुढाकाराने स्काऊट गाईडच्या मुलामुलींनी विविध उपक्रम राबवत समाजामध्ये जनजागृती केली.
कार्यक्रमाचा प्रारंभ साक्षरता फेरीने झाला. “सारे शिकूया, पुढे जाऊया” अशा घोषणा देत राजूर गावामधून साक्षरता फेरी काढण्यात आली. या प्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव श्री.एम.एल.मुठे, संचालक श्री.विजयजी पवार, संचालक श्री.मिलिंदशेठ उमराणी, प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बु-हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर, श्री.एस.आर.देशमुख, श्री.आर.पी.पांडे, श्रीमती जंबे मॅडम, डॉक्टर किरण उमराणी यांचेबरोबरच राजूर गावचे नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी साक्षरता दिनाच्या संकल्पनेवर आधारित वेगवेगळी चित्रे काढून चित्ररूपी संदेश दिला.












