February 13, 2026


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रम सर्वत्र राबविला जात आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ताज्या व पौष्टिक भाज्यांचा पुरवठा व्हावा, त्यांच्या आहारात पोषकद्रव्यांची भर पडावी, तसेच विद्यार्थ्यांचा निसर्गाशी स्नेह निर्माण व्हावा यासाठी केंद्र शासनाने ‘परसबाग’ उपक्रम सुरू करण्याच्या सुचना शाळांना दिल्या आहेत.

वरील सर्व उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेऊन एक आदर्श अशी परसबाग निर्माण केली आहे. विद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या पश्चिमेच्या बाजूस जवळपास ७ गुंठे क्षेत्र हे परसबागेसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे. परसबागेतील उत्पादित भाजीपाला हा शालेय पोषण आहारासाठी नियमितपणे वापरला जातो.

दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शालेय सेंद्रिय परसबागेतील भाजीपाला प्रदर्शन व वितरण कार्यक्रम अतिशय आनंदमयी वातावरणात पार पडला. परसबागेतील मेथी, कोबी, फ्लॉवर व पालक या भाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. त्यानंतर हा भाजीपाला शालेय पोषण आहार विभागाचे श्री.जी.एल.शिंदे, श्रीमती सीमा बिडवे व धोंगडे ताई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.   

विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी शालेय सेंद्रिय परसबागेचे महत्व विषद केले. शालेय परसबाग फुलविण्यासाठी विशेष योगदान असलेले उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक श्री.सुरेश शेटे यांचा विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ व मेथीची जुडी देऊन सत्कार करण्यात आला.

या परसबागेला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन केलेले आहे. पाणी बचतीसाठी ठिबक व तुषारसिंचन तंत्राचा वापर केला जातो. कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर या परसबागेमध्ये केला जात नाही. परसबागेच्या लगतच गांडूळखत व कम्पोस्टखत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आलेला आहे.

GO TO HOME PAGE