August 29, 2026


गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांनी ‘रक्षाबंधन’ सण साजरा


रक्षाबंधन हा एक महत्वाचा भारतीय सण आहे, जो भाऊ-बहिणीच्या प्रेमळ आणि पवित्र नात्याचे प्रतीक आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखाची कामना करते, तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. 

गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज विविध उपक्रमांनी ‘रक्षाबंधन’ सण उत्साहात साजरा करण्यात आला. माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही विभागांमध्ये स्वतंत्ररीत्या रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला.

स्काऊट गाईड प्रमुख श्री.धनंजय लहामगे यांच्या संकल्पनेतून सकाळच्या सत्रामध्ये माध्यमिक विभागामध्ये ‘एक राखी पेड के नाम’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. विद्यालय परिसरातील झाडांना विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून स्वतःच्या हाताने बनविलेल्या राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. मुलींनी झाडांना आपला भाऊ मानून त्यांना राखी बांधली व त्यांच्या रक्षणाची प्रतिज्ञा केली. यावेळी मुलींनी मनोगते व्यक्त करून झाडांप्रती आपली निष्ठा व संवेदना व्यक्त केली. 

विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बु-हाडे, पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे, स्काऊट गाईड प्रमुख श्री.धनंजय लहामगे व श्रीमती रीना राठोड, एन.सी.सी. प्रमुख श्री.संजय देशमुख, हरितसेना प्रमुख श्री.श्रीकांत घाणे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 


दुपारच्या सत्रात उच्च माध्यमिक विभागामध्ये देखील रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. शिस्तबद्ध पद्धतीने रांगा करून मुलींनी मुलांना राख्या बांधल्या. महिला शिक्षिकांनी देखील आपल्या सहकारी शिक्षकांना राख्या बांधून त्यांच्याप्रती आदरभाव प्रकट केला. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.दिपक बु-हाडे, ज्येष्ठ शिक्षका श्रीमती बिना सावंत व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ज्येष्ठ शिक्षक व कार्यक्रम प्रमुख श्री.सुरेश शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रक्षाबंधन सणाचे महत्व व उद्देश विषद केला. शाळेमध्ये रक्षाबंधन साजरा केल्याने विद्यार्थ्यांमध्ये सौहार्दपूर्ण मैत्रीची भावना निर्माण होते असेही त्यांनी  सांगितले. ज्येष्ठ शिक्षका श्रीमती बिना सावंत यांनी बहिण-भावाच्या पवित्र नात्याला स्पर्श करणारी एक सुंदर हिंदी कविता सदर करून रक्षाबंधन हा विद्यार्थ्यांसाठी प्रेम आणि संरक्षणाचे बंधन साजरे करण्याचा एक आनंददायी प्रसंग असल्याचे उपस्थितांना सांगितले.

ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद तुपविहिरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला.

GO TO HOME PAGE