February 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंददायी शनिवार‘ हा एक विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम राबविण्यामागे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्व गुण विकसित करणे व त्यांना ताणतणावमुक्त आणि आनंददायी वातावरणात शिक्षण देणे हे मुख्य उदेश आहेत. हसत-खेळत वातावरणामध्ये एखाद्या कृतीच्या माध्यमातून काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट शिकण्यासाठी शनिवारच्या दिवशी शाळेमध्ये हा उपक्रम राबविला जातो.
या अनुषंगाने गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नुकताच एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. एरोबिक डान्स च्या मदतीने विद्यार्थ्यांची संगीत कवायत घेण्यात आली. मूल्यवर्धित शिक्षणाच्या माध्यमातून कृतीयुक्त गीते यावेळी सादर करण्यात आली. संगीत व नृत्याचा सुरेल संगम साधत विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणा-या कलागुणांचे सदरीकरण केले. विविध प्रकारची योगासने व कवायत विद्यार्थ्यांनी आनंदाने करावी व त्यांच्यामध्ये शारीरिक व्यायामाची गोडी निर्माण व्हावी हा उद्देश या कृतीमागचा होता.
विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.एस.आर. देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. श्री.धनंजय लहामगे, श्री.धनंजय पगारे, श्री.श्रीकांत घाणे, श्री.नानासाहेब शिंदे, श्रीमती रीना राठोड, श्रीमती प्रियांका खराटे यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी देखील सक्रिय सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे व पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर यांनी या नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.











