March 12, 2026
अटल टिंकरिंग लॅब (ATL) हा भारत सरकारच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ अंतर्गत सुरू केलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता, संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी या प्रयोगशाळांमध्ये 3D प्रिंटिंग, रोबोटिक्स, सेन्सर्स आणि मायक्रोकंट्रोलर्स यांसारखी आधुनिक साधने उपलब्ध करून दिली जातात. याद्वारे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रत्यक्ष प्रयोग करून नवनवीन समस्यांवर उपाय शोधण्याची संधी मिळते. भविष्यातील नवनिर्मिती करणाऱ्या तरुण पिढी घडविण्यासाठी आणि डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी ही लॅब एक प्रभावी माध्यम ठरत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता, संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने सन २०२० पासून गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अटल टिंकरिंग लॅबची निर्मिती करण्यात आली आहे.
Niti Ayog, ATAL Innovation Mission, Lend A Hand India, SCERT पुणे व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर या ठिकाणी नुकतेच ATAL Project Exhibition (अटल प्रकल्प प्रदर्शन) आयोजित करण्यात आले. या प्रकल्प प्रदर्शनामध्ये अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील अटल टिंकरिंग लॅब असलेल्या शाळांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला. प्रत्येक विद्यालयातून चार प्रकल्पांची या प्रदर्शनामध्ये मांडणी करण्यात आली.
गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामधून विद्यार्थी व शिक्षकांनी बनविलेले चार प्रकल्प या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित करण्यात आले.
1. Electronics (Human following Robot Car using IR Sensor)
2. Mechanical (Mobile Parking System for School using Carpentry)
3. Digital Literacy (Money Management)
4. Theme-based (Smart Agreetech)
या चार वेगवेगळ्या विषयांवर आधारित प्रकल्प बनविण्यात आले होते. अथक परिश्रम घेऊन विद्यार्थी व शिक्षकांनी अटल लॅबमधील साहित्याचा प्रभावी व कल्पकतेने वापर करून हे प्रकल्प बनविले. राजुरसारख्या ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी व शिक्षकांनी या अतिशय आव्हानात्मक प्रदर्शानामध्ये सहभागी होणे ही विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब आहे.
या महत्वाकांक्षी व आव्हानात्मक अशा प्रदर्शनामध्ये विद्यालयाला सहभागी करून घेण्यासाठी शिक्षक श्री.शशिकांत हेकरे, श्री.अमोल तळेकर व श्री.महेश दिंडे या तिघांनी प्रचंड मेहनत घेतली. वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षणे घेतली व विद्यार्थ्यांना प्रेरित केले. खालील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपापल्या प्रकल्पाचे उत्कृष्ठ सादरीकरण केले-
१. वंशिता संतोष नंदवानी
२. लोहरे स्वराली नामदेव
३. श्रावणी ज्ञानेश्वर शिंदे
४. राधिका निलेश सूर्यवंशी
५. सर्वेश संतोष सपकाळ
६. नेहल वसीम तांबोळी
७. श्रीहर्षा गौराम बिडवे
८. निवेदिता वैभव पवार
संगमनेर महाविद्यालयातील तज्ञ प्रशिक्षक श्री.आदित्य फाफाळे यांनी सातत्याने विद्यालयाला भेट देऊन प्रकल्पकार्य करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री. दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.











