October 15, 2026


माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन‘ म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि समाजात वाचन संस्कृतीचा प्रसार करणे हे या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या निमित्ताने शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ज्ञानाची आणि वाचनाची आवड लक्षात घेऊन हा दिवस वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी समर्पित केला गेला आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त आवांतर वाचन होणे आवश्यक आहे. आवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही आवांतर वाचनाचा उपयोग होतो. वाचनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास साध्य करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर येथे आज १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन‘ म्हणून साजरा केला गेला. माध्यमिक व उच्च माध्यमिक दोन्ही विभागांमध्ये हा दिन विविध उपक्रमांनी साजरा केला गेला.

सकाळच्या सत्रामध्ये उच्च माध्यमिक विभागामध्ये ‘वाचन प्रेरणा दिन‘ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमामध्ये मराठी विषय शिक्षक श्री.संतराम बारवकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. अतिशय सुरेख शैलीमध्ये श्री.बारवकर यांनी ‘वाचन प्रेरणा दिन‘ व वाचनाचे महत्व विषद करून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित केले. ‘जगातील सर्वात सौंदर्यसंपन्न वस्तू म्हणजे पुस्तक होय. पुस्तके आपणास आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दाखवून अंतर्मनात डोकावयास शिकवितात. वाचनाने प्रगल्भ व समृद्ध झालेली माणसे कुणापुढेही नतमस्तक होत नाही. स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेक क्रांतिकारकांनी तुरुंगवासाच्या काळात वाचन व लेखन करून स्वातंत्र्यलढ्याला बळकटी दिली’, असे मौलिक विचार श्री.बारवकर यांनी आपल्या व्याख्यानामध्ये मांडले.

विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.दिपक बु-हाडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगून डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या वाचन-छंदाची विद्यार्थ्यांना आठवण करून दिली व विद्यार्थ्यांना या वैशिष्ठ्यपूर्ण अशा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ शिक्षक श्री.अण्णासाहेब धतुरे, श्री.रमेश शेंडगे, सौ.बीना सावंत व श्री.संतोष कोटकर व्यासपीठावर उपस्थित होते. श्री.अण्णासाहेब धतुरे यांनी आभार मानले. श्री.सचिन लगड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


दुपारच्या सत्रामध्ये माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्रांगणात एकत्र करून त्यांना वाचनासाठी पुस्तके देण्यात आली. अतिशय प्रसन्न अशा वातावरणात विद्यार्थी अक्षरशः वाचनामध्ये दंग झाले होते. वेगवेगळ्या लेखकांची वेगवेगळी पुस्तके वाचण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाबद्दलची उत्सुकता व आवड दिसून आली.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर व उपमुख्याध्यापक श्री.संजय व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना या दिनाचे व वाचनाचे महत्व सांगितले. ग्रंथपाल श्री.साहेबराव घुले, ज्येष्ठ शिक्षक श्री.संजय देशमुख, मराठी विषय शिक्षक श्री.गोरक्ष शिंदे व श्री.प्रवीण मालुंजकर यांचेसह माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.