August 09, 2026


गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा


दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जगभरात जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) डिसेंबर १९९४ मध्ये या दिवसाची घोषणा केली होती. ९ ऑगस्ट १९८२ रोजी जिनिव्हा येथे आदिवासी समुदायासाठीच्या विशेष कार्यगटाची पहिली बैठक पार पडली होती. याच ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून हा दिवस निवडण्यात आला. आदिवासी बांधवांच्या जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांचे रक्षण करणे, त्यांच्या समृद्ध संस्कृतीचे जतन करणे, तसेच शिक्षण, आरोग्य आणि मानवी हक्कांबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणे हा हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले हा आदिवासीबहुल तालुका. तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या कळसुबाई शिखराच्या व हरिश्चंद्रगडाच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले राजूर हे गाव शिक्षण व व्यापाराचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. १९५८ पासून राजूर गावातील गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे आदिवासी समाजासाठी अखंडपणे शैक्षणिक कार्य करत आहे.

आज दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर या विद्यालयात जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात विद्यार्थी आणि कर्मचारी दोघांचाही उत्साही सहभाग दिसून आला. क्रांतिकारक राघोजी भांगरे व महानायक विरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अतिशय आनंददायी वातावरणात घोषणा देत राजूर गावातून मिरवणूक काढण्यात आली.

राजूर व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत बाळगोपाळांचे कौतुक केले. क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची वेशभूषा परिधान करून घोड्यावर स्वार झालेला इयत्ता १२ वी चा विद्यार्थी सुरज मुठे याने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. राजूर गावचे उपसरपंच श्री.संतोष बनसोडे व माजी सरपंच श्री.गणपत देशमुख यांनी राजूर गावाच्या वतीने विद्यालय पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. सत्यनिकेतन संस्थेचे माजी सचिव श्री.टी.एन.कानवडे व विद्यमान ज्येष्ठ संचालक श्री.विजय पवार यांनी मिरवणुकीदरम्यान उपस्थित राहून विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह वाढविला.

विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी पोशाख परिधान केला होता. विविध आदिवासी समाजांच्या रीतिरिवाजांचे प्रदर्शन करत आदिवासी समुदायांचे महत्त्व अधोरेखित करणारे विविध नृत्यप्रकार सादर केले. लेझीम पथक, झांज पथक, झेंडा पथक, ढोल-ताशा पथक, आदिवासी नृत्य व रेकॉर्ड डान्स यांचे सदरीकरण करत विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाप्रती आपली एकरूपता प्रकट केली.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बु-हाडे व पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख श्री.शिंदे जी.एल., श्री.शेटे एस.जे., श्री.देशमुख एस.आर. व श्री. लगड एस.के. यांनी कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन केले. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

GO TO HOME PAGE