August 1, 2026


दरवर्षी १ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते. या दिवशी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या दोन्ही महान व्यक्तींच्या कार्याचा गौरव केला जातो.

गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, ज्येष्ठ शिक्षक श्री.आण्णासाहेब धतुरे यांच्यासह उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ज्येष्ठ शिक्षक श्री.रविंद्र मढवई यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या सामाजिक व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या टिळकाच्या सिंहगर्जनेची श्री.मढवई त्यांनी आठवण करून दिली.

“फकिरासंगे फकीर झाले आण्णाभाऊ
भिमरावाची लकीर झाले आण्णाभाऊ,
गुलामीस मांडत गेले शब्दाशब्दातून
त्या शब्दांचे अबीर झाले आण्णाभाऊ,
व्यथा कथेतून समाजातला लेख मांडला
साहित्यात या कबीर झाले आण्णाभाऊ”

या स्वयंरचित काव्यपंक्तींच्या माध्यमातून ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद तुपविहिरे यांनी लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची ओळख करून दिली. कथेच्या, कवितेच्या व पोवाड्याच्या माध्यमातून कष्टकरी, शोषित व दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांना सामाजिकदृष्ट्या जागृत करण्यासाठी आण्णाभाऊंनी आपले संपर्ण आयुष्य वेचले. ‘पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर तरलेली नसून कष्टकरी व शोषितांच्या हातावर तरलेली आहे’ या आण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विधानाची श्री.तुपविहिरे यांनी आठवण करून दिली.