June 8, 2026


संस्था आणि शिक्षक यांचे नाते परस्परपूरक आहे, कारण संस्था शिक्षकांना भौतिक पायाभूत सुविधा, शैक्षणिक साधने आणि प्रशासकीय पाठबळ पुरवून ज्ञानदानासाठी पोषक वातावरण निर्माण करते, तर शिक्षक आपल्या कौशल्याने आणि समर्पणाने संस्थेच्या शैक्षणिक उद्दिष्टांना प्रत्यक्ष वर्गात साकार करतात. संस्थाचालकांच्या शिक्षकांकडून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रामुख्याने गुणवत्तापूर्ण निकालाची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा असते. शिक्षकांनी केवळ पाठांतरावर भर न देता आधुनिक डिजिटल साधने आणि कृतीयुक्त शिक्षण पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट कराव्यात, अशी सर्वच संस्थाचालकांची इच्छा असते.

याच अनुषंगाने सत्यनिकेतन संस्था पदाधिकारी व संस्थेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची एक संयुक्त सहविचार सभा नुकतीच गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडली. सत्यनिकेतन संस्थेचे सचिव मा.एम.एल.मुठे, ज्येष्ठ संचालक श्री.एस.टी.एलमामे व श्री.व्ही.डी.पवार या संस्था पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राजूर, खिरविरे, कातळापूर व शेनित येथील संस्थेच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय, आश्रमशाळा व वसतिगृह विभागातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, अधीक्षक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२०२५ -२६ या शैक्षणिक वर्षातील कामकाजाचा आढावा व २०२६-२७ या वर्षासाठी करावयाचे नियोजन यासंदर्भात संस्था पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी प्रास्ताविक करून संस्था पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.एस.टी.एलमामे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. १९५० सालापासून सत्यनिकेतन संस्था आदिवासी समाजाच्या विकासासाठी कशी कार्य करत आलेली आहे याची देखील माहिती त्यांनी दिली. संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सत्यनिकेतन संस्थेचे सचिव मा.एम.एल.मुठे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थी गुणवत्तावाढ व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावर प्रामुख्याने प्रकाश टाकला. शिक्षकांनी केवळ वर्गात अध्यापन न करता विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व नैतिक मूल्ये रुजवावीत, बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित करावीत आणि वेळेचे तंतोतंत पालन करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय, शैक्षणिक कामांसोबतच संस्थेच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, पालकांशी सकारात्मक संवाद साधून संस्थेची प्रतिष्ठा वाढवणे आणि सहकाऱ्यांशी मिळूनमिसळून काम करत शालेय शिस्त टिकवून ठेवणे, संस्थेपुढील विविध आव्हाने या बाबींचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

अभ्यासात मागे असणाऱ्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष पूरक वर्ग घेणे, हुशार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे आणि क्रीडा, विज्ञान प्रदर्शन अशा सह-शालेय उपक्रमांद्वारे त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे गरजेचे आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एकूणच, विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळवू नयेत, तर त्यांच्यात शिस्त, नैतिक मूल्ये आणि आत्मविश्वास निर्माण होऊन संस्थेचा नावलौकिक वाढावा, ही अपेक्षा सचिव मा.एम.एल.मुठे यांनी व्यक्त केली.

विद्यार्थी गुणवत्तावाढ व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात मा. सचिवांनी केलेल्या आवाहनाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत संस्थेच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सर्व कर्मचाऱ्यांनी दिले. गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.