March 20, 2026


दरवर्षी २० मार्च हा दिवस जगभरात जागतिक चिमणी दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो. वाढते शहरीकरण, मोबाईल टॉवर्सचे रेडिएशन आणि अन्नाची कमतरता यांमुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. म्हणूनच त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने २० मार्च २०१० रोजी पहिला ‘जागतिक चिमणी दिन’ साजरा करण्यात आला. निसर्गातील अन्नसाखळी संतुलित राखण्यात चिमण्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ‘जागतिक चिमणी दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यालयातील Eco-club व राष्ट्रीय हरित सेने मार्फत वर्षभरात पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबविण्यात येतात. ‘जागतिक चिमणी दिवनाचे’ औचित्य साधून माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनविले. त्याचबरोबर प्लास्टिक मुक्त संदेश देणाऱ्या रंगीबेरंगी व सुंदर अशा कापडी पिशव्या बनविल्या. या सर्व कलाकृती विद्यार्थ्यांसमोर प्रदर्शित करण्यात आल्या.

ज्येष्ठ शिक्षक तथा Eco-club व राष्ट्रीय हरित सेना प्रमुख श्री.श्रीकांत घाणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. याप्रसंगी बोलताना श्री.श्रीकांत घाणे यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना पक्ष्यांचे महत्व, कापडी पिशव्यांचे महत्व व प्रदूषणाचे दुष्परिणाम विषद केले. ज्येष्ठ शिक्षिका सौ.बीना सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या पर्यावरणाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले. ‘एक घास चिऊताईचा’ असे म्हणत आई आपल्या बाळाला भरविते याची आठवण सौ.बीना सावंत यांनी करून देताना आपल्या जीवनप्रवासामध्ये चिमणी आपली अतिशय विश्वासू सहकारी असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी बनविलेली घरटी विद्यालय परिसरातील झाडांवर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

GO TO HOME PAGE