January 20, 2026
क्रांतिकारक राघोजी भांगरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), राजूर येथे तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शन (Skill Exhibition/Trade Fair) आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली तांत्रिक कौशल्ये आणि तांत्रिक क्षमतांना वाव देण्यासाठी या तंत्रप्रदर्शनाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. विविध ट्रेडमधील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण असे प्रकल्प, प्रात्यक्षिके व मॉडेल्स अतिशय कल्पक व प्रभावीपणे सादर केले. अकोले, राजूर, मवेशी व केळी कोतूळ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या एकूण १५७ विद्यार्थ्यांनी बनविलेले जवळपास ४५ मॉडेल्स या तंत्रप्रदर्शनात मांडण्यात आले होते.
गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये राजूर आय.टी.आय.चे प्राचार्य श्री.यु.डी.पालवे, गटनिदेशक श्री.अर्जुन नागरे, अकोले आय.टी.आय.चे प्राचार्य श्री.अरुण भालेराव, मवेशी आय.टी.आय.चे प्राचार्य श्री.जगदीश गवळी, केळी कोतूळ आय.टी.आय.चे प्राचार्य श्री.अनिल सोनसाळी, गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री.बाळासाहेब घिगे, श्री.सुरेश शेटे, श्री.विनोद तारू, श्रीमती आरती खाडे, कु.मधुमंजेरी पवार, श्रीमती नलिनी मदगे व त्याचबरोबर अकोले, राजूर, मवेशी व केळी कोतूळ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सर्व गटनिदेशक, शिल्पनिदेशक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गटनिदेशक श्री.अर्जुन नागरे यांनी आपल्या प्रास्ताविकात हे तंत्रप्रदर्शन आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.दिपक बुऱ्हाडे यांनी तांत्रिक शिक्षण व कौशल्यविकास यांचे महत्व विषद केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तंत्रप्रदर्शन हे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडणारे आणि त्यांच्या कौशल्यांना वाव देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. राजूर आय.टी.आय.चे प्राचार्य श्री.यु.डी.पालवे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या तंत्रप्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेली यंत्रे व आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची आवड, कल्पकता आणि कौशल्ये पाहून सर्व उपस्थितांना समाधान वाटले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी स्वतःला विकसित करून समर्थ व शाश्वत भारताच्या उभारणीत योगदान देऊ शकतात आणि याचा निश्चितच त्यांना भविष्यात मोठा लाभ होणार आहे असे गौरवोद्गार सर्व उपस्थितांनी काढले.
गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या तंत्रप्रदर्शनास सदिच्छा भेट दिली. हे तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राजूर आय.टी.आय.चे सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.











