February 19, 2026
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाखात हजर राहून सर्वांचेच लक्ष वेधले. सकाळच्या अतिशय प्रसन्न वातावरणात शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते रंगमंचापर्यंत मिरवणुक काढून ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करत आसमंत दुमदुमून गेला.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर व प्रमुख व्याख्याते श्री.संतराम बारवकर यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वैशिष्ठ्यपूर्ण बाब म्हणजे सावित्रीबाई मदन कन्या निवासच्या मुलींनी शाळेच्या परसबागेतील पाना-फुलांनी बनविलेला हार महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे यांनी केले. डेनिस किनकेड या ब्रिटीश लेखकाने १९३० साली लिहिलेल्या ‘शिवाजी: द ग्रॅंड रेबेल’ या पुस्तकातील काही महत्वाच्या बाबींचा त्यांनी उल्लेख केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री.बी.के.बनकर यांनी विद्यार्थ्यांना महाराजांप्रमाणेच शिस्त, संस्कार व समाजहित जोपासण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री.संतराम बारवकर यांनी आपल्या प्रभावी वाणीतून शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचे अनुकरण कसे करावे याविषयी प्रेरणादायी विचार मांडले. ‘धैर्य आणि शौर्य यांचे दुसरे नाव म्हणजेच शिवाजी महाराज. अंधश्रद्धेला महाराजांनी कधी थारा दिला नाही, स्त्रियांप्रती त्यांच्या मनात सदैव आदर होता, जातीधार्मांना महाराजांनी कधी आश्रय दिला नाही, अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेची सेवा करण्याचा संकल्प महाराजांनी केला होता’ असे प्रतिपादन श्री.बारवकर यांनी यावेळी केले. तसेच शिवनिती, गनिमी कावा आणि महाराजांच्या युद्धकौशल्याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
महाराजांचा पेहराव परिधान केलेला बालशिवाजी कार्यक्रमाच्या आकर्षणाचा केंद्र होता. ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख यांनी आपल्या सुमधुर आवाजामध्ये शिवाजी महाराजांची गीते गाऊन वातावरणामध्ये नवचैतन्य निर्माण केले. सावित्रीबाई मदन कन्या निवासच्या मुलींनी सुंदर नृत्य सादर केले.
वसतिगृह अधीक्षिका श्रीमती जोशी मॅडम व अधीक्षक श्री.ढगे सर हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. पर्यवेक्षक श्री.जी.बी.मालुंजकर यांनी आभार मानून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.महेश दिंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.













