March 09, 2026
गोधडी हे केवळ पांघरूण नाही, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय. गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे. गोधडी म्हणजे जुन्या लुगड्यांचे व जुन्या धोतरांचे चौकोनी तुकडे जोडून, एकावर एक ठेवून शिवलेली चादर होय.
इ ८ वी च्या मराठी विषयाच्या पाठयपुस्तकामध्ये ज्येष्ठ कवी डॉ.कैलास दौंड यांची ‘गोधडी‘ ही कविता अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक-कवी म्हणून डॉ.कैलास दौंड परिचित आहेत. गोधडी या प्रतिकातून कवींनी कौटुंबिक नात्यांमधील प्रेममय व जिव्हाळ्याच्या आठवणी भावस्पर्शी शब्दांत सांगितल्या आहेत. गोधडी म्हणजे गरिबीतही निष्ठेने व प्रेमाने जगण्याचा वसा आहे याची जाणीव ही कविता करून देते.
भाषा हे नवनिर्मितीचे मुख्य साधन आहे. विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी आनंददायी उपक्रम विद्यार्थी मनापासून करतात. हे मनात ठरवून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील उपक्रम व प्रकल्प यांमुळे मिळविलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्व-प्रयत्नाने पक्के करण्याचा उद्देश ठेवून उपक्रमांची आखणी केली जाते.
याच अनुषंगाने सत्यनिकेतन संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर या विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक श्री.दीपक पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना कविता अध्यापनाबरोबरच ज्ञानरचनावादी अध्ययन-अनुभवांतून कृतियुक्त उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले. ‘गोधडी’ कविता शिकविताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती द्यावी असे त्यांच्या नकळतपणे मनात आले.
विशेष बाब म्हणजे श्री.पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कवी डॉ.कैलास दौंड यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. ज्या कवीची कविता आपण शिकतोय तेच कवी साक्षात आपल्याशी बोलल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
आजी आणि आईच्या बोटाला गोधडी शिवताना पडणारे खड्डे आजच्या आधुनिक काळातील विद्यार्थ्यांना समजावेत, नात्यांची उसवत चाललेली वीण घट्ट रहावी म्हणून विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने, घरातील कोणाचीही मदत न घेता गोधडी स्वतः शिवून तयार करून आणण्यास सांगितले. एक महिन्यात विद्यार्थ्यांनी हा उपक्रम पूर्ण केला.
विद्यार्थ्यांनी प्रेरित होऊन बस्करच्या मापाच्या गोधडी स्वतः हाताने तयार करून आणल्या. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे विद्यालयाकडून कौतुक करण्यात आले. इयत्ता ८ वी ड मधील विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतः तयार केलेली गोधडी घेऊन सर्व विद्यार्थ्यांच्या समोर रंगमंचावर उभे करण्यात आले होते. गोधडीवर विद्यार्थ्यांनी गोधडीचे विविध अर्थाचे शब्द लिहिले होते. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवनिर्मितीचा आनंद ओसंडून वाहत होता.
या अतिशय स्तुत्य अशा नवोपक्रमाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री. दिपक बुऱ्हाडे व पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. या नवोपक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांचे श्री.दीपक पाचपुते यांना सहकार्य लाभले.












