April 14, 2026
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर, ता. अकोले, जि.अहिल्यानगर येथे आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले या दोन युगपुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त संगमनेर महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा.डॉ राहुल हांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख यांनी आपल्या सुमधुर आवाजामध्ये वामनदादा कर्डक यांचे ‘माणसा इथे मी तुझे गीत गावे…’ हे गीत गाऊन वातावरणामध्ये नवचैतन्य निर्माण केले. सावित्रीबाई मदन कन्या निवासच्या मुलींनी सुंदर गीते व नृत्य सादर केले.
याप्रसंगी बोलताना प्रा.डॉ राहुल हांडे यांनी या दोन्ही युगपुरुषांच्या महान कार्याचा उल्लेख करून उपस्थितांना वर्तमानातील व्यवस्थेकडून केला जाणारा बुद्धिभेद उदाहरणासहीत स्पष्ट केला. ‘तुमची बुद्धि व कर्तबगारी हेच तुमचे खरे भवितव्य घडवत असतात. प्रामाणिकपणे कार्य करणारे सामान्य माणसे हेच खरे आदर्श व सुसंस्कृत पिढी घडवत असतात. या दोन्ही महामानवांनी शोषित, पीडित आणि महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. समता, शिक्षण आणि सामाजिक क्रांतीचा विचार या दोन्ही युगपुरुषांनी समाजातील तळागाळापर्यंत रूजविला. त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने दिशा देणारे आहेत.’ असे प्रतिपादन प्रा.डॉ राहुल हांडे यांनी केले. आजच्या तरुण पिढीने जात-पात, धर्म,पंथ या पलीकडे जाऊन या दोन्ही महापुरुषांचे विचार आचरणात आणले पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांचेही विचार, ध्येय आणि मार्ग एकच होता – तो म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुता. या महामानवांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविणे ही खरी काळाची गरज असल्याचे सांगून प्रत्येकाने चिकित्सक वृत्ती जोपासली पाहिजे व कर्मकांडातून बाहेर पडले पाहिजे असे मत आपल्या अध्यक्षीय मनोगतून त्यांनी मांडले.
विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रींचा उल्लेख करत महापुरुषांचे विचार सक्षम समाजाची निर्मिती करतो असे प्रतिपादन केले. ज्येष्ठ शिक्षक व कार्यक्रमाचे संयोजक श्री.शरद तुपविहीरे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करुन दिला. विद्यालयाच्या वतीने डॉ.राहुल हांडे यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.गोरक्ष मालुंजकर, सावित्रीबाई मदन कन्या निवासच्या अधिक्षीका श्रीमती श्रध्दा जोशी व विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षक श्री.दीपक पाचपुते यांनी आभार मानून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.श्रीकांत घाणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.











