June 15, 2026
शाळा प्रवेश उत्सव हा नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळा पुन्हा सुरू होताना साजरा केला जातो. या उत्सवाचा मुख्य उद्देश शाळेत पहिल्यांदा पाऊल ठेवणाऱ्या आणि जुन्या विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण करणे, शाळांमधील पटसंख्या वाढवणे आणि पहिल्याच दिवशी मुलांमधील भीती दूर करून आनंददायी वातावरण तयार करणे हा आहे. या दिवशी शाळा सुंदर सजवून विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फूल, चॉकलेट किंवा तिलक लावून स्वागत केले जाते, तसेच त्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि गोड खाऊ देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात उत्साहाने सामील करून घेतले जाते.
शालेय शिक्षणाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संस्मरणीय क्षण असल्याने या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी वातावरणात केल्यास त्यांचा उत्साह द्विगुणित होईल आणि शैक्षणिक वर्षाची सुरूवात अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात होईल, हा यामागील मुख्य उद्देश असतो.
गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव अतिशय चैतन्यमय व आनंददायी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे ढोल-ताश्यांच्या गजरात तिलक लावून स्वागत करण्यात आले. फुलांनी, चित्रांनी व फुग्यांनी शाळेची सुंदर सजावट करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल हा अभिनव उपक्रम यावेळी राबविण्यात आला. कुंकवाच्या ताटात विद्यार्थ्यांचे पाय बुडवून नवीन कोऱ्या पेपरवर स्वतःच्या पायाचा ठसा उमटवून हे पेपर विद्यार्थी व पालकांना देण्यात आले. त्याचबरोबर आकर्षक असा सेल्फी पॉइंट यावेळी तयार करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी यामध्ये सेल्फी काढण्याचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह पहावयास मिळाला.
विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप याप्रसंगी करण्यात आले. सर्व शिक्षकांनी नवीन विद्यार्थी व पालकांना आपला परिचय करून दिला. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.











