September 21, 2026

थोर समाजसेवक व दानशूर व्यक्तिमत्त्व शिक्षणमहर्षी डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला) यांच्या वाढदिवसानिमित्त सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग तसेच विविध शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक मा.डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ‘समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही सामाजिक बांधिलकी आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे’, असे प्रतिपादन यावेळी बोलताना डॉ.विश्वासराव आरोटे यांनी केले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा योग्य उपयोग करून शिक्षणात प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार तथा माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाबरोबरच शिस्त, मेहनत आणि संस्कार यांचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून ध्येय निश्चित करावे आणि सातत्याने प्रयत्न करत यश मिळवावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश महाले, प्राचार्य भाऊसाहेब बनकर, पर्यवेक्षक संजय व्यवहारे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सहसचिव प्रा.सचिन लगड यांनी केले. विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नानासाहेब शिंदे यांनी केले.











