February 20, 2026


सत्यनिकेतन संस्था संचलित गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केंद्र क्रमांक २१४३ या केंद्रावर आजपासून एस.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२६ सुरळीतपणे सुरु झाली.

महाराष्ट्र शासनाच्या ‘कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा’ या संकल्पनेअंतर्गत ही परीक्षा सुरु झाली. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर व पंचायत समिती शिक्षण विभाग, अकोले यांच्या नियंत्रणाखाली यावर्षाची दहावीची ही परीक्षा पार पडत आहे.

परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासन निर्देशानुसार यावर्षाची परीक्षा ही CCTV व LIVE Webcasting या तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हे केंद्र सक्षम व सर्व सुविधायुक्त आहेत. परीक्षा सुरु होण्यापूर्वी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही केंद्रांना भेट देऊन ही केंद्रे सर्व सुविधायुक्त असल्याचे तपासून घेतले. दोन्ही केंद्रांच्या सर्व वर्गाखोल्यांमध्ये व परिसरामध्ये CCTV कॅमेरे तैनात आहेत व इमारतींभोवती संरक्षक भिंती आहेत.

परीक्षा सुरु होण्यापूर्वी सर्व पर्यवेक्षकांची बैठक घेऊन त्यांना पर्यवेक्षणासंदर्भातील सर्व सूचना व झालेले बदल यासंदर्भात सूचित करण्यात आले. या केंद्राचे केंद्रसंचालक म्हणून प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर हे काम पाहत आहेत तर सहाय्यक म्हणून श्री.पी.वाय.लांडगे, श्री.संजय देशमुख, श्री.महेश दिंडे व श्री.प्रसाद गुरव काम पाहत आहेत. एकूण ४८० विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत.

अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये पहिल्या पेपरच्या दिवशी दोन्ही केंद्रांवर विद्यार्थी व पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सत्यानिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.रामशेठ पन्हाळे, गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर, मुख्याध्यापक श्री.संपत धुमाळ, पत्रकार श्री.प्रकाश महाले व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.के.जी.पवार यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन सुरक्षिततेचा व बंदोबस्ताचा आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र विठे येथील वैद्यकीय पथक देखील वैद्यकीय सुविधा देत आहेत.

‘कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा’ या संकल्पनेअंतर्गत दोन्ही केंद्रांवरील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी तथा परिरक्षक मा.श्री.अरविंद कुमावत, विस्तार अधिकारी श्रीमती सविता कचरे, केंद्रप्रमुख श्रीमती स्वाती आडाणे व केंद्रसंचालक श्री.भाऊसाहेब बनकर केले आहे.

GO TO HOME PAGE