September 27, 2025
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंददायी शनिवार‘ हा एक विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम राबविण्यामागे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्व गुण विकसित करणे व त्यांना ताणतणावमुक्त आणि आनंददायी वातावरणात शिक्षण देणे हे मुख्य उदेश आहेत. हसत-खेळत वातावरणामध्ये एखाद्या कृतीच्या माध्यमातून काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट शिकण्यासाठी शनिवारच्या दिवशी शाळेमध्ये हा उपक्रम राबविला जातो.
या अनुषंगाने गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्काऊट-गाईड आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजूर गावातील प्रमुख मंदिर परिसराची स्वच्छता केली. यामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्र, रेणुका माता मंदिर, श्री सप्तशृंगी माता मंदिर आणि खोकलाई माता मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला. स्वच्छता मोहिमेनंतर सर्व विद्यार्थ्यांनी मंदिरात एकत्रित आरती करून भक्तीभाव व्यक्त केला.
या प्रसंगी प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर सर, उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.गोरख मालुंजकर यांच्यासह एनसीसी प्रमुख श्री.संजय देशमुख, स्काऊट-गाईड प्रमुख श्री.धनंजय लहामगे आणि श्रीमती रीना राठोड उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने राजगिरा लाडू आणि केळीचे वाटप करण्यात आले. सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील या उपक्रमाचे अहिल्यानगर स्काऊट-गाईड आयुक्तांनी विशेष कौतुक केले व विद्यार्थ्यांना खूप-खूप शुभेच्छा दिल्या.













