May 17, 2026
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूरच्या सुशांत मच्छिंद्र रोंगटे या विद्यार्थ्याने एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. सुशांतने SSC परीक्षेत सर्वच्या सर्व ६ विषयांत तंतोतंत ‘३५’ गुण मिळवून एक अनोखा ‘बॅलन्स’ साधला आहे. गणिताच्या भाषेत सांगायचे तर हा केवळ योगायोग नसून एक ‘परफेक्ट स्टॅटिस्टिकल वंडर’ आहे.
सुशांतने केलेल्या या आगळ्यावेगळ्या विक्रमाची सर्व प्रसार माध्यमांनी दाखल घेतली व ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. सुशांत हा गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगा. त्याचे आई-वडील कामानिमित्त चाकण येथे असतात व गावी आजी-आजोबा सुशांतचे पालनपोषण करतात. गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर या शाळेमध्ये सुशांतने बसने प्रवास करत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले दहावीचे शिक्षण पूर्ण केले.
सुशांतने दहावीच्या परीक्षेत सर्वच्या सर्व ६ विषयांत तंतोतंत ‘३५’ गुण मिळवून व ३५ टक्क्याने उत्तीर्ण होऊन एक अनोखा विक्रम केला. समाजमाध्यमांद्वारे ही बातमी लातूर जिल्ह्यातील कौठा उमरगा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते श्री.विनायकराव पाटील यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ऐतिहासिक हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या सावरकुटे या सुशांतच्या गावी येऊन सुशांतची व त्याच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. सुशांतने मिळविलेल्या यशाबद्दल त्यांनी त्याचा सत्कार केला व पेढा भरवून त्याचे कौतुक केले. यावेळी त्यांनी सुशांत व त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधत मनमुराद गप्पा मारल्या. सुशांतचे आई-वडील व नातेवाईक यांच्याशी त्यांनी सुशांतच्या पुढील शिक्षणासंदर्भात चर्चा केली. सुशांतने आपल्याला भविष्यात चांगले शिक्षण घेऊन चांगले करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली. विनायकराव पाटील यांनी सुशांतच्या भावी शिक्षणाची व करिअरची जबाबदारी घेत त्याला दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. सुशांतला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी श्री.विनायकराव पाटील यांनी स्वीकारली.
९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असते परंतू अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या सुशांतसारख्या विद्यार्थ्यांचा देखील समाजाने गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी भावना यावेळी विनायकराव पाटील यांनी व्यक्त केली. गरीब, भूकंपग्रस्त, दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आतापर्यंत अनेक अनाथ व निराधार मुलांना आधार देत त्यांचे पालकत्व विनायकराव पाटील यांनी स्वीकारलेले आहे.
यावेळी श्री.विनायकराव पाटील यांच्या समवेत सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.विजय पवार, गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.के.बनकर, उपप्राचार्य श्री.डी.जी.बुऱ्हाडे, पत्रकार श्री.प्रकाश महाले, शिक्षक श्री.दिपक पाचपुते, श्री.संजय देशमुख व श्री.रविंद्र मढवई उपस्थित होते. एका गरीब व आदिवासी कुटुंबाला आधार दिल्याबद्दल विनायकराव पाटील यांचे सर्वांनी आभार मानले. त्यांनी सुशांतच्या शाळेला देखील सदिच्छा भेट दिली. शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
















