July 21, 2026
शालेय विद्यार्थ्यांमध्ये एलपीजी गॅसच्या सुरक्षित वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘भारत गॅस सुरक्षा जागरूकता कार्यक्रम’ (Bharat Gas Safety Awareness Program) हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी स्वतः सुरक्षित राहून आपल्या पालकांनाही जागरूक करू शकतात. लहान वयात मिळालेले हे सुरक्षिततेचे धडे विद्यार्थी आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि आपल्या घराला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.
साई अर्पण भारत गॅस ग्रामीण वितरक, कळस यांचे वतीने गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘भारत गॅस सुरक्षा क्लिनिक’ (Bharat Gas Safety Clinic) हा एक अत्यंत कौतुकास्पद असा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कंपनीच्या तज्ञ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना एलपीजी (LPG) गॅसचे महत्त्व आणि त्याच्या स्वरूपाची माहिती देण्यात आली. गॅस सिलिंडर आणि शेगडी वापरताना घ्यावयाची काळजी तसेच गॅस गळती (Gas Leakage) झाल्यास तातडीने काय करावे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांना रेग्युलेटर लावणे, काढणे, आपत्कालीन उपाय व त्याचबरोबर गॅस गळती तपासण्याच्या काही पध्दती प्रात्यक्षिक रूपात दाखविण्यात आल्या. शिक्षक श्री.प्रविण मालुंजकर व श्रीमती कविता वाळुंज यांनी देखील गॅस सुरक्षिततेबाबतची माहीती समजावून घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री. दिपक बुऱ्हाडे, पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.











