September 14, 2026
गणरायाचे आगमन…
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. अवघ्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाची समाप्ती अनंत चतुर्दशीला होते.
‘गणपती बाप्पा मोरया’ व ‘मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करत आज गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले. विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ढोल ताशांच्या व टाळ-मृदुंगाच्या गजरात, नृत्य व फुगड्यांच्या साथीने बाप्पाच्या आगमनाची मिरवणुक काढून बाप्पाचे स्वागत करण्यात आले. रांगोळी व रंगीबेरंगी फुलांनी विद्यालय परिसराची सजावट करण्यात आली होती.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बु-हाडे, पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी बाप्पाचे स्वागत केले. विद्यालयाचे ग्रंथपाल श्री.साहेबराव घुले यांच्या हस्ते गणेश मूर्तीचे पूजन करण्यात आले. श्री.धनंजय लहामगे यांनी या पूजेचे सुश्राव्य असे पौराहित्य केले. गणरायाच्या स्थापनेनंतर मोठ्या जल्लोषात आरती करण्यात आली.
कार्यक्रम प्रमुख श्री.श्रीकांत घाणे व श्री.सचिन लगड यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले. श्री.श्रीकांत घाणे यांनी गणेशमूर्ती देणगी स्वरुपात दिल्याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवादरम्यान आयोजित विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. जेष्ठ शिक्षक श्री.धनंजय पगारे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.







September 18, 2026
गणरायाला निरोप…
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत आज सर्वोदयच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. याप्रसंगी काढण्यात आलेल्या शिस्तबद्ध अशा विसर्जन मिरवणुकीला राजूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. लेझीम पथक, झांझ पथक, झेंडा पथक, बालकलाकारांचे ढोलपथक व रेकॉर्ड डान्स यांचे सदरीकरण करत विद्यार्थ्यांनी राजूर ग्रामस्थांची मने जिंकली.
कला-शिक्षक श्री.रावसाहेब पांडे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी जंगली प्राण्यांची रूपे धारण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. राजूर गावामध्ये विसर्जन मिरवणुकीचे ठिकठिकाणी गणपती मंडळांकडून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ व पाण्याचे वाटप करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.बनकर बी.के., उपप्राचार्य श्री.बु-हाडे डी.जी., पर्यवेक्षक श्री.व्यवहारे एस.पी. तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम प्रमुख श्री.घाणे एस.व्ही. व श्री.लगड एस.के. यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केले. जेष्ठ शिक्षक श्री.धनंजय पगारे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. राजूर पोलीस स्टेशनचे पी.आय. श्री.किशोर पवार साहेब हे देखील मिरवणुकीत सहभागी होते. त्यांच्या हस्ते आरती करून अतिशय भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.













