August 14, 2026


१० करोड नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान हा भारताला व्यसनमुक्त आणि निरोगी बनवण्याच्या दिशेने सुरू असलेला एक अत्यंत महत्त्वाचा आणि राष्ट्रव्यापी लोकचळवळीचा उपक्रम आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट देशातील तब्बल १० कोटी नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन न करण्याची शपथ देणे हे आहे.

राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित असलेला हा पंधरवडा केवळ वैयक्तिक व्यसनमुक्तीपूरता मर्यादित नसून, कौटुंबिक स्वास्थ्य, तरुणांचे रक्षण आणि सशक्त राष्ट्रनिर्मितीचा एक महान संकल्प आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकाने स्वतः नशा न करणे, आपल्या कुटुंबाला व्यसनांच्या प्रभावापासून दूर ठेवणे आणि इतर किमान पाच जणांना या कल्याणकारी मोहिमेत सामील करून व्यसनमुक्तीची शपथ देणे अपेक्षित आहे, ज्यामुळे सामाजिक पातळीवर एक सकारात्मक आणि शाश्वत बदल घडून येईल.

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, राजूर शाखा यांचे वतीने गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सामुहिक नशामुक्ती प्रतिज्ञेचे आयोजन करण्यात आले. जवळपास १६०० विद्यार्थ्यांनी नशामुक्ती प्रतिज्ञा घेऊन या महाअभियानामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदविला.

यावेळी या केंद्राचे संचालक श्री.जगन्नाथ आरोटे, ब्रह्मकुमारी योगिता व ब्रह्मकुमारी मंगल माता उपस्थित होते. विद्यार्थ्यांना नशामुक्ती अभियानाचा उद्देश सांगून नशेच्या दुष्परिणामांबद्दल जागृत करण्यात आले. दारू, तंबाखू व ड्रग्ज यासारख्या विविध प्रकारच्या व्यसनांच्या हानिकारक परिणामांबद्दल विद्यार्थी आणि समाजात जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने हा महासंकल्प संपूर्ण देशभर राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यात युवकांची भूमिका आणि मानसिक आरोग्य याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य श्री.दिपक बु-हाडे, पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे व त्याचबरोबर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. श्री.संतराम बारवकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. व्यसनमुक्तीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आणि त्यांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास व व्यसनापासून दूर राहण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम यशस्वी ठरला.


GO TO HOME PAGE