August 29, 2026


हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती (Fitness) आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे या हेतूने हा दिन साजरा केला जातो. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि खिलाडूवृत्ती यांसारख्या गुणांचा विकास होतो आणि त्यांना अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.

गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणे, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देणे तसेच खिलाडूवृत्ती, शिस्त आणि संघभावना विकसित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्याचबरोबर क्रीडा साहित्याचे पूजनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्रीडा शिक्षक श्री.विनोद तारू यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या जीवनातील संघर्ष, जिद्द, मेहनत आणि देशासाठी दिलेल्या योगदानातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन श्री.विनोद तारू यांनी केले. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाप्रेमातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी नियमित खेळ आणि व्यायामाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यालयाचे उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे यांनी नियमित क्रीडा सराव व व्यायामामुळे शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासोबतच मानसिक प्रसन्नता आणि व्यक्तिमत्त्व विकासासही मदत होते, असे यावेळी नमूद केले. खेळामुळे शरीर सुदृढ, मन प्रसन्न आणि व्यक्तिमत्त्व सक्षम होते असा संदेश देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना खेळामध्ये सहभागी होण्यासंदर्भात व त्याचबरोबर शारीरिक-मानसिक आरोग्य टीकविण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर व पर्यवेक्षक श्री.संजय व्यवहारे यांनीही विद्यार्थ्यांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

क्रीडा शिक्षक श्री.जालिंदर आरोटे व श्री.विनोद तारू यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद तुपविहिरे यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

GO TO HOME PAGE