October 13, 2026


गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च-माध्यमिक विभागाचा कला मंडळ व वाङमय मंडळाचा उदघाटन सोहळा आज लोकप्रिय कवी डॉ.स्वप्निल चौधरी यांचे शुभहस्ते पार पडला.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. अत्यंत साध्या व ओघवत्या शैलीमध्ये डॉ.स्वप्निल चौधरी यांनी अनेक प्रसंग विनोदी शैलीमध्ये सांगत उपस्थितांना अक्षरशः पोट धरून हसविले. ‘दंगल समजून घेऊ’, ‘बायको’, ‘कर्जबारपणाची जिंदगी’, ‘निसर्ग’ यासारख्या आपल्या कविता सादर करताना त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

आपल्या आयुष्यातील अनेक घटना व अनुभव सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा अर्थ उलगडून सांगितला. कला व वाङमय या दोन्ही गोष्टींनी आपले व्यक्तिमत्व कसे घडते हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये मुला-मुलींनी आपला आत्मविश्वास कसा वाढविला पहिले याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. “ज्याच्या हातामध्ये पुस्तक, तो कुणापुढेही होत नाही नतमस्तक” असे सांगताना त्यांनी जीवनात शिक्षणाचे महत्व विषद केले. लढाऊपणाचा अंगीकार, टीकेकडे दुर्लक्ष व दुसऱ्यांशी तुलना टाळणे हीच यशस्वी जीवनाची खरी त्रिसूत्री असल्याचे त्यांनी सांगितले.    

विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘कलेची उपासना करताना समर्पित वृत्ती हवी, संघर्षाविना कोणतेही यश मिळत नाही. ज्ञान मिळवा, संघर्ष करा व स्वतःला सिद्ध करा हाच जीवनाचा मूलमंत्र आहे’, असे प्रतिपादन माननीय प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये केले.

उपप्राचार्य श्री.दिपक बु-हाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षक व कार्यक्रमाचे संयोजक श्री.शरद तुपविहिरे यांनी पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. कला मंडळ प्रमुख श्री.बाळासाहेब घिगे यांनी आभार मानले. श्री.संतराम बारवकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.संजय व्यवहारे, माजी प्राचार्य श्री.लहानू परबत यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उच्च-माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.


GO TO HOME PAGE