February 02, 2026


गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप तथा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहामध्ये व थाटामध्ये साजरा करण्यात आला. पुढील आठवड्यामध्ये सुरु होणाऱ्या एच.एस.सी. परीक्षेसाठी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविला.

अ‍ॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.एस.टी.येलमामे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा सकाळच्या अतिशय प्रसन्न वातावरणात पार पडला. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे यांनी केले.

कला विभागाच्या वतीने श्री.सुरेश शेटे, वाणिज्य विभागाच्या वतीने श्री.अण्णासाहेब धतुरे व विज्ञान विभागाच्या वतीने श्री.रविंद्र मढवई या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अ‍ॅड.एम.एन.देशमुख महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.अनिल आवारी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या १२ वी नंतरच्या विविध कोर्सेसची विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी पूर्वा लहामगे, गोरक्ष लहामटे, प्रतिक इधाटे, गणेश डहाळे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना विद्यालयातील त्यांच्या दोन वर्षातील वास्तव्यादरम्यान त्यांना आलेले अनुभव अतिशय ओघवत्या शैलीत विषद केले. यावेळी विद्यार्थ्यामध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. बहुतांश विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परीधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

विद्यालयाचे प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना “कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती…” या हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेचा अत्यंत साध्या व सोप्या भाषेमध्ये अर्थ सांगून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. सत्यनिकेतन संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री.एस.टी.येलमामे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार व थोरा-मोठ्यांचा मानसन्मान करण्याचा व अंगी स्वयंशिस्त बाळगण्याचा सल्ला दिला. कीर्तिवंत, यशवंत व गुणवंत होण्याचा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘इयत्ता १२ वी ची परीक्षा हीच खऱ्या अर्थाने जीवनाची खरी कसोटी आहे. परीक्षा म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नसून तुमच्या स्मरणशक्तीची कसोटी आहे, म्हणून स्मरणशक्ती मजबूत करा’, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.भाऊसाहेब देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना केले. इयत्ता १२ वी नंतर असणाऱ्या अनेक करिअर संधींचा उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतामध्ये केला.

ज्येष्ठ शिक्षक श्री.शरद तुपविहिरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर श्री.बाळासाहेब घिगे यांनी आभार व्यक्त केले. उच्च माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

GO TO HOME PAGE