February 14, 2026
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप तथा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहामध्ये व थाटामध्ये साजरा करण्यात आला. पुढील आठवड्यामध्ये सुरु होणाऱ्या एस.एस.सी. परीक्षेसाठी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविला.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.गोरक्ष मालुंजकर यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय प्रसन्न वातावरणात पार पडला. दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री.जी.एल.शिंदे यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक श्री.किशोर देशमुख व सेवानिवृत्त शिक्षक श्री.रामभाऊ आढळ हेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
शिक्षकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात श्री.दिपक पाचपुते व सौ.वंदना सोनवणे यांनी आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शेखर लहामटे, शुभम शेळके, दीक्षा मुठे, विद्या परते, आयुष्का वाकचौरे, श्रुती परते, भावेश येलमामे, जितेंद्र गभाले, साई माने, कार्तिकी धोंगडे, प्रेरणा गवारी, श्रुष्टी भांडकोळी या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना विद्यालयातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांना आलेले अनुभव अतिशय ओघवत्या शैलीत विषद केले. आपल्या शालेय आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींबरोबरचे क्षण सांगताना अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. यावेळी विद्यार्थ्यामध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. बहुतांश विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परीधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
‘इयत्ता १० वी ची परीक्षा ही आपल्या आयुष्याची एक सत्वपरीक्षा असते व या परीक्षेला सामोरे जाताना मनावर कुठल्याही प्रकारचे दडपण न ठेवता धैर्याने या परीक्षेला आपण सामोरे जायचे असते’ असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.गोरक्ष मालुंजकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना केले.
या कार्यक्रमात इयत्ता १० वी च्या चारही तुकड्यांमधील (अ/ब/क/ड) विद्यार्थ्यांनी विद्यालयाला कृतज्ञतेपोटी चार व्हाईटबोर्ड भेटवस्तू म्हणून प्रदान केले. विद्यालयाच्या प्रगतीसाठी या भेटवस्तू दिल्याबद्दल प्राचार्य श्री.भाऊसाहेब बनकर व उपप्राचार्य श्री.दिपक बुऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.
श्री.कृष्णा बेणके यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर श्री.शशिकांत हेकरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
















